उस्मानाबाद : मागील आठ ते दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील १७७ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. असे असले तरी आणखी प्रकल्पांच्या घशाला कोरड कायम आहे. त्यामुळे आणखी पावसाची गरज व्यक्त होत आहे.मागील दोन वर्षामध्ये पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाली. त्यामुळे विहिरी, विंधन विहिर आदी स्त्रोतांची पाणीपातळीही झपाट्याने खालवली. अर्धाअधिक पावसाळा कोरडा गेल्यानंतर आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या सुरूवातीला जिल्हाभरात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तलवात कमी-अधिक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात एक मोठा, सतरा मध्यम तर १९३ लघू व साठवण तलाव आहेत. जिल्ह्यातील एकमेव मोठा असलेल्या सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांपैकी केवळ एक प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. अन्य एका प्रकल्पात ७५ टक्क्यापेक्षा अधिक साठा आहे. दोन प्रकल्पांत ५१ ते ५७ टक्के पाणीसाठा झाला असून अतर दोन प्रकल्पांमध्ये सध्या २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. सहा प्रकल्पांत २५ टक्के पेक्षा कमी, चार प्रकल्प जोत्याच्याखाली असून एक प्रकल्प कोरडाच आहे. जिल्ह्यात १९३ लघू प्रकल्प असून, यातील २० प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. चार प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक साठा असून तेरा प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के साठा आहे. तेरा प्रकल्पांत २६ ते ५० टक्के पाणी साचले आहे. ४५ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. असे असले तरी आजही ६५ प्रकल्प जोत्याखाली असून उर्वरित ३३ प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे असे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा, मध्य प्रकल्पामध्ये कळंब तालुक्यातील रायगव्हाण तलाव कोरडा आहे. तसेच ढोकी, कोलेगाव करजखेडा, खामसवाडी, घुगी, येवती, टाकळी, केशेगाव, जाग्जी, बेंबळी, गोपाळवाडी, पाडोळी (आ),बोरगांव राजे, धुत्ता, कोंड, पेंठसागवी, सरोडी, जेवळी, माळेगाव, शिराढोण, ढोराळा, आडसूळवाडी, नागुलगांव, बारातेवाडी, येडेश्र्वरी, गिरलगाव, घुलेवाडी, डुककरवाडी, उमाचीवाडी, जांब या लघू प्रकल्पामध्ये अजिबात पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.
१७७ प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला !
By admin | Updated: September 10, 2014 00:47 IST