उस्मानाबाद : सार्वजनिक स्त्रोताच्या पाण्याची अणूजीवविषयक तपासणी जानेवारी महिन्यात करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १६६ गावात स्त्रोतांचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले.सध्या जिल्ह्यातील अनेक जलस्त्रोत आटले असून, काही शेवटच्या घटका मोजत आहेत. पाणी पातळी जसजशी खालावत आहे त्यानुसार दूषित पाण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेकडून दर महिन्याला जिल्ह्यातील सार्वजनिक स्त्रोतांचे पाणी नमुने घेऊन तपासणी करण्यात येते. जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यातील ९३५ नमुने तपासणीसाठी या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. तपासणीअंती सुमारे १६६ स्त्रोतांचे पाणी दूषित आढळून आले आहे. यामध्ये भूम तालुक्यातील १४७ स्त्रोतांचे पाणी नमुने प्रयोगकशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी १८ स्त्रोतांचे पाणी पिण्यास योग्य नाही, कळंब तालुक्यातील १०२ पैकी १३, लोहारा तालुक्यातील ८८ पैकी ०६, उमरगा १२७ पैकी ११, उस्मानाबाद २२८ पैकी ४९, परंडा ५० पैकी ०६, तुळजापूर तालुक्यातील १५३ पैकी ५३ तर वाशी ५३ पैकी १० पाण्याचे नमुने दूषित आढळून आले होते. आठ तालुक्यांतील ९३५ नुमने जिल्हा प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, यात ६६ नमुने दूषित आढळून आले याचे प्रमाण १८ टक्के असल्याचे प्रयोग शाळेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील १६६ पाणी नमुने दूषित
By admin | Updated: January 8, 2015 00:57 IST