शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ ते लातूर या राज्यमार्गाचे मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनधारक नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पंधरा कोटीच्या खर्चाचा अर्धवट राज्यमार्ग पूर्ण कधी होणार? असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे. शिरूर अनंतपाळ-लातूर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक २५ या रस्त्यास वर्षभरापूर्वी राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा मार्ग असताना या रस्त्यासाठी जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शिवाय राज्यमार्ग झाल्यानंतरही दुरुस्तीसाठी निधी खर्च करण्यात आला आहे. तरीही हा रस्ता अद्यापही अर्धवट राहिला असून, मुशिराबाद येथे एकेरी सिमेंट रस्ता आहे. तर बोरी गावाजवळ दोन ठिकाणी हा रस्ता वादाच्या भोवर्यात अडकला आहे. मागील पावसाळ्यात तर बोरीच्या पुढे राज्यमार्गावर तळे साचले होते. तेथून नावेत बसून पुढे जाण्याची वेळ लोकांवर आली होती. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वार्तांकन केले होते. त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाने मुख्य रस्त्यावरील पाण्याचे तळे हटविले होते. परंतु पुन्हा या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, रस्त्यात असंख्य खड्डे पडल्याने वाहनधारकांना या मार्गावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय लोकांचा वेळ आणि इंधनावरील आगाऊ खर्च विनाकारण होत असल्याने बांधकाम खाते याकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न प्रवाशांतून केला जात आहे. वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. यात अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. चारचाकी वाहनांचेही मोठे अपघात होत आहेत. (वार्ताहर)
१५ कोटींचा राज्यमार्ग अर्धवट
By admin | Updated: May 7, 2014 00:21 IST