छत्रपती संभाजीनगर : अब्दीमंडी, चाऊस कॉलनी, हिमायत बाग परिसरातील मोक्याच्या जमिनी विक्रीचे आमिष दाखवून व्यापारी व सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या शेख इरफान शेख शफीक (३८, रा. दिल्लीगेट) याला त्याचा नोकर शेख जमील शेख रसूल (रा. रोजेबाग) याच्यासह अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. घोटाळा उघड झाल्यानंतर इरफान फेब्रुवारीतच शहर सोडून मुंबईत लपून बसला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
या प्रकरणात इरफानसह त्याचा भाऊ शेख सलमान शेख शफीक, आई गौसिया बेगम शेख शफीक, वडील शेख शफीक उर्फ शेख साहब (सर्व रा. दिल्लीगेट), शेख जमील शेख गुलाम रसूल (३४, रा. रोजेबाग) आणि शेख इम्रान शेख गफ्फार (रा. कैसर कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. इरफानने हिमायतनगरमधील १९ गुंठे आणि जोगवाडा येथील १६ एकर २९ गुंठे जमीन विक्रीचे आमिष दाखवून सिल्लोड येथील व्यावसायिक शेख इम्रान शेख अहमद शरीफ यांची १ कोटी ९० लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी ४ फेब्रुवारीला सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
एकामागोमाग तिघांना गंडायाच टोळीने असद खान अजीज खान (रा. सब्जीमंडी) यांना अब्दीमंडी गट क्रमांक ४० मधील ३१ आरचे तीन प्लॉट व चाऊस कॉलनीतील ८८ आर जमिनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून ९० लाख रुपये उकळले. तिसऱ्या घटनेत अशाच पद्धतीने एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याची १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. दुसऱ्यांची जमीन स्वतःची असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे तयार करून व्यवहार केल्याचे उघड झाले आहे.
महसूल विभागावरही प्रश्नचिन्हइरफान व त्याचे कुटुंब बनावट कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्री करत असल्याचे समोर आले आहे. असे दोन महिन्यात तब्बल पाच घोटाळे समोर आले. मात्र, महसूल विभागाकडून त्याची पडताळणी न झाल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. चौकशीत नावे निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार व उपनिरीक्षक सचिन देशमुख करत आहेत.
कोट्यवधी लुटले; बँक खाती रिकामीइरफान केवळ बारावी शिक्षण घेतलेला असून, अनेक वर्षांपासून जमीन खरेदी-विक्री व्यवसायात सक्रिय होता. अवघ्या तीन व्यवहारांत त्याने ४ कोटी १३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. मात्र, त्याची बँक खाती रिकामी असल्याचे तपासात समोर आले आहे. उपनिरीक्षक सचिन देशमुख, अंमलदार सय्यद शकील, बाळासाहेब राठोड, विजयानंद गवळी, गणेश शिंदे, सखाराम मोरे, कृष्णा शिंदे, संदीप जाधव यांनी ही कारवाई केली.
Web Summary : A property agent from Chhatrapati Sambhajinagar, involved in a ₹4.13 crore scam, was arrested in Mumbai. He allegedly defrauded businessmen and retired police officers by falsely promising land sales in prime locations. The investigation revealed a network involving family members and accomplices, raising questions about revenue department oversight.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर के एक प्रॉपर्टी एजेंट, जो 4.13 करोड़ रुपये के घोटाले में शामिल था, को मुंबई में गिरफ्तार किया गया। आरोप है कि उसने प्रमुख स्थानों पर जमीन की बिक्री का झूठा वादा करके व्यापारियों और सेवानिवृत्त पुलिस अधिकारियों को धोखा दिया। जांच में परिवार के सदस्यों और साथियों से जुड़े एक नेटवर्क का खुलासा हुआ, जिससे राजस्व विभाग की देखरेख पर सवाल उठे।