औरंगाबाद : महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी प्रशासनातर्फे सुमारे ११ कोटी रुपयांचे विविध प्रस्ताव ठेवण्यात आले होते. अवघ्या दहा मिनिटांमध्ये हे प्रस्ताव एका सुरात मंजूर करण्यात आले. खाजगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्थेला मुदतवाढ देण्यास काही नगरसेवकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. नगरसेवकांच्या विरोधाला न जुमानता सभापतींनी ठराव मंजूर केला.स्थायी समितीच्या बैठकीत पहिल्यांदाच प्रशासनाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रस्ताव ठेवण्यात आले होते. सकाळी ११.३० वाजता बैठकीला सुरुवात होताच सभापती मोहन मेघावाले यांनी विषयपत्रिकेला सुरुवात केली. अवघ्या दहा मिनिटांत सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. कोट्यवधी रुपयांच्या या प्रस्तावावर फार चर्चा झाली नाही. महापालिकेत मागील अनेक वर्षांपासून खाजगी सुरक्षारक्षक महाराणा सेक्युरिटी अॅन्ड लेबर सप्लायर्स या कंपनीकडून घेण्यात आले आहेत. याच कंपनीकडून वाहनचालकही घेण्यात आले आहेत. मागील महिन्यात मनपाने या दोन्ही कामांसाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत याच कंपनीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव बैठकीत होता. या प्रस्तावाला काही नगरसेवकांनी विरोध दर्शविला.
११ कोटींचे प्रस्ताव १० मिनिटांत मंजूर!
By admin | Updated: September 28, 2016 00:44 IST