लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात नगर परिषदेच्या काळात बांधण्यात आलेल्या दहापेक्षा अधिक पाण्याच्या टाक्यांचे आयुष्य संपले असून, त्यांची पडझड आता सुरू झाली आहे. शनिवारी सकाळी सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीचा जिना कोसळला. त्यानंतर शहरातील जीर्ण पाण्याच्या टाक्यांचा मुद्या ऐरणीवर आला आहे. मागील २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या १३ पाण्याच्या टाक्या वापराविना पडून आहेत. त्याचा वापर आता मनपाला करता येणार नाही. मोडकळीस आलेल्या आणि वापर नसलेल्या २३ पाण्याच्या टाक्या भुईसपाट करण्याशिवाय मनपाकडे कोणताच पर्याय उरलेला नाही.शहराची तहान भागविण्यासाठी महापालिका सध्या ५० पाण्याच्या टाक्यांचा वापर करीत आहे. त्यातील १० टाक्यांचे आयुष्य यापूर्वीच संपले आहे. नगर परिषदेच्या काळात या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. कोणत्याही क्षणी या पाण्याच्या टाक्या कोसळू शकतात. त्यामध्ये सिडको एन-७, संजयनगर जिन्सी, क्रांतीचौक, सिडको एन-५ येथील टाक्यांचा समावेश आहे. क्रांतीचौक आणि एन-५ येथील पाण्याच्या टाक्यांचा स्लॅब यापूर्वीच कोसळला आहे. १९८५ मध्ये जिन्सी मैदानावरील पाण्याची टाकी अशाच पद्धतीने कोसळली होती. आसपास घरे नसल्याने कोणतेच नुकसान झाले नाही. सध्या धोकादायक बनलेल्या दहा पाण्याच्या टाक्यांचा वापर अचानकपणे बंद केल्यास शहरात पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब सुरू होईल. मनपाकडे पर्यायी व्यवस्थाच नाही. सिडको एन-७ येथील पाण्याची टाकी बंद केली तर १३ वॉर्डांना पाणीपुरवठा कसा करायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशीच अवस्था संजयनगर जिन्सी येथील पाण्याच्या टाकीची आहे. महापालिकेला तातडीने पर्यायी व्यवस्था करावी लागणार हे निश्चित.शहरातील जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाक्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करा, अशी मागणी दोन वर्षांपासून नगरसेवक करीत आहेत. प्रशासन मात्र, याकडे दुर्लक्ष करीत आहे. एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रशासनाला प्रतीक्षा आहे का...? असा प्रश्नही नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील १० जलकुंभाचे यापूर्वीच आयुष्य संपले!
By admin | Updated: July 3, 2017 01:05 IST