छत्रपती संभाजीनगर : बाजारपेठेत सध्या १० रुपयांची नोट कमी दिसत आहे. विशेषत: किरकोळ खरेदीमध्ये याचा त्रास जास्त जाणवत आहे. एवढेच नव्हे तर २० रुपयांच्या नोटांचेही हाल बेहाल आहेत. यामुळे ग्राहक व व्यापारी यांच्यात वादावादी होत आहेत.
कुठे गायब झाल्या १० रुपयांच्या नोटा?मागील काही महिन्यांपासून बाजारपेठेत १० रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवत आहे. ज्या नोटा बाजारात आहेत, त्या अत्यंत खराब आहेत. अचानक नोटांची कमतरता का भासू लागली, असा प्रश्न व्यापारी व ग्राहकांना पडला आहे. १० रुपयांच्या नोटा चलनात आहेत; पण दिसत का नाही. व्यापाऱ्यांनी नोटा दाबून ठेवल्या आहेत, असा आरोप ग्राहक करीत आहेत तर बँका १० रुपयांच्या नोटा देत नाहीत, असा आरोप व्यापारी करीत आहेत. तथापि, १० रुपयांच्या नोटांची कमतरता नाही, असे बँक अधिकारी सांगत आहेत.
रिझर्व्ह बँकेने नोटांचा पुरवठा केला कमीएसबीआयच्या करन्सी चेस्टमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिवाळीपासून १० रुपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा रिझर्व्ह बँकेने केलाच नाही. पतपुरवठा कमी केला आहे. यामुळे १० च्या नवीन नोटा बाजारात कमी दिसत आहेत. ज्या फाटक्या, दुर्मीळ नोटा आहेत, त्या नोटा बँक घेत असून त्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे विविध शाखांमध्ये जमा झाले आहेत. त्या नोटा रिझर्व्ह बँकेला परत पाठविण्यात येणार आहेत.
कॅशलेस व्यवहार वाढीसाठी१० रुपयांच्या नोटांची बाजारात कमतरता आहे. सरकारला युपीआय आणि कॅशलेस व्यवहार वाढवायचे आहेत. डिजिटल करन्सीला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक पतपुरवठा कमी करत आहे, असे वाटते. आजघडीला शहरात ५० टक्के व्यवहार रोखीने तर ५० टक्के व्यवहार युपीआयमार्फत होत आहे. अजून निम्मे ग्राहक नगदी व्यवहार करीत असल्याने रिझर्व्ह बँकेने १० रुपयांच्या नोटांचा पुरवठा करावा.-लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ