परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : अंगाखांद्यावर खेळण्याचे वय. कोण आपला अन् कोण परका याची थोडीशी समजही नाही. त्यातच शारीरिक वाढही पूर्ण नाही. मात्र अशाही स्थितीत चिमुकल्या मुली वासनांध तरुणांच्या बळी ठरत असल्याचे वास्तव जिल्ह्यात दिसून येत आहे. मागील आठ महिन्यांचा विचार केल्यास तब्बल ५८ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांना उद्ध्वस्त केले आहे.
विशेष म्हणजे यात बरेच जवळचे म्हणणारेही आप्तेष्टही आहेत. २१ व्या शतकात महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर पोहोचल्या आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. परंतु, आजही शहरीसह ग्रामीण भागातही चिमुकल्या मुली व महिला सुरक्षित नाही. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कायदे केले. तरीही चिमुकल्यांसह ज्येष्ठ महिलांकडे वासनांध नजरेने बघितले जात असल्याचे अत्याचाराच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
पालकांनो, मुलांशी सुसंवाद ठेवा बऱ्याच कुटुंबात पालक व पाल्य यांच्यात संवाद हरवल्याने दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे बऱ्याच प्रकरणात गरोदरपणाचे लक्षणे दिसेपर्यंत प्रकरणच सामोर येत नाही. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या पाल्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे
कुठे वडील, कुठे काका तर कुठे शेजारीअल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या काही प्रकरणामध्ये तर चक्क वडील, काका, भाऊ वा शेजाऱ्याने आपल्या वासनेची शिकार चिमुकल्यांना बनवल्याचे उघडकीस आले आहे. खोट्या अब्रूच्या भीतीपोटी बऱ्याच ठिकाणी या प्रकरणाला दाबण्याचाही प्रयत्न करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
१३ बालिकांवर मातृत्वाचे ओझे जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या काळात ५८ अल्पवयीन मुली वासनांधांच्या शिकार झाल्या आहेत. त्यातील १३ अल्पवयीन मुलींवर मातृत्वाचे ओझेच लादल्याची नोंद बालकल्याण समितीकडे आहे. अत्याचार, बालविवाह, वासनांध प्रेम अशा विविध प्रकारातून कोवळ्या जीवांवर मातृत्वांचे ओझे लादले आहेत.
अत्याचाराची आकडेवारीजानेवारी - ८फेब्रुवारी - २मार्च - १२एप्रिल - १०मे - १२जून - ४जुलै - ७ऑगस्ट - ३
"मागील आठ महिन्यांत बालकल्याण समितीकडे ५८ प्रकरणे आली आहेत. यात १३ गर्भवती अल्पवयीन मुलींचासुद्धा समावेश आहे. ही प्रकरणे आल्यानंतर त्या पीडितांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आमच्याकडून करण्यात येतो."- अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चंद्रपूर