चंद्रपूर : सध्या जिकडे-तिकडे भ्रष्टाचार, गुन्हेगारी फोफावली आहे. पोलीस यंत्रणा पुराव्याअभावी यावर आळा घालण्यात अपयशी ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांची पुरावे गोळा करताना दमछाक होत असल्याने त्यांची ओरड कुणीही लक्षात घेत नाही. आता समाज सुधारक फाऊंडेशन भ्रष्टाचार पोखरून काढण्यासाठी पुढे सरसावली आहे. त्यांनी नानाविध प्रकारची आधुनिक यंत्रे विदेशातून आणले असून दोषींच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी ही यंत्रे नागरिकांना विनामुल्य पुरविली जाणार आहेत, अशी माहिती समाज सुधारक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन पोहाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.चहुबाजूने फोफावत चाललेली गुन्हेगारी, भ्रष्टाचार संपविण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या अधिनस्त येणाऱ्या सीबीआय, सीआयडी, स्थानिक गुन्हे शाखा व अॅन्टी करप्शन ब्युरो कुचकामी ठरत आहे. आरोपी विरोधात ठोस पुरावे नसणे हे सुध्दा आरोपी सुटण्याचे मुख्य कारण आहे. आरोपीला गुन्ह्यात अडकविण्यासाठी जे नियम घालून दिले आहेत वा ज्या प्रकारची स्थिती असावी, असे संकेत आहेत, तशा प्रकारचे पुरावे सरकारी तपास यंत्रणा गोळा करू शकत नाही. कारण त्यांच्याकडे गुन्हे शोधण्यासाठी जे आधुनिक तंत्रज्ञान व यंत्र असायला हवे, ते राहत नाही, असे बऱ्याच प्रकरणावरून दिसून आल्याचे पोहाणे यांनी यावेळी सांगितले. याशिवाय सरकारी व खासगी कंपन्यांमध्ये अनेकवेळा महिलांवर अत्याचार केले जातात. त्यांना शारिरिक व मानसिक त्रास दिला जातो. मात्र पुराव्याअभावी मोठ्या अधिकाऱ्यांविरोधात बोलायला कुणीही धजावत नाही. अशावेळी रेकॉर्र्डींग व व्हिडोओ फुटेजच्या माध्यमातून पुरावा देऊन अत्याचार थांबवून दोषींवर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे समाज सुधारक फाऊंडेशनने भ्रष्टाचारमुक्त देश घडविण्यासाठी हे मिशन सुरू केले आहे. यात नागरिक व महिलांना विनामुल्य आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त विविध मशिन्स उपलब्ध करून दिले जातील. त्याच्या माध्यमातून गुन्हेगारी थांबण्याची अपेक्षा आहे.
तुम्ही द्या पुरावे, आम्ही खणू भ्रष्टाचार !
By admin | Updated: August 18, 2014 23:24 IST