लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे ग्रामीण वार्ता पुरस्कार, शुभवार्ता पुरस्कार, मानवी स्वारस्य अभिरूची वृत्तकथा, वृत्तछायाचित्र, दूरचित्रवाणीसाठी उत्कृष्ठ वार्ताहर पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.ग्रामीण वार्ता पुरस्कार स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण वार्ताहर भाग घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी परिणामकारक वृत्त, वार्तापत्र, वृत्तमालिका ग्राह्य धरण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन पुरस्कारासह दोन प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात येणार आहेत. रोख पुरस्कार, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.स्व.छगनलाल खजांची स्मृती शुभवार्ता पुरस्कार केवळ चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी असून विधायक विषयावर झालेले लिखाण यासाठी पात्र समजण्यात येईल. लोकसेवा आणि विकास प्रतिष्ठानतर्फे प्रायोजित मानवी स्वारस्य अभिरूची पुरस्कार देण्यात येणार असून रोख पुरस्कारासह स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रायोजित हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धाही घेण्यात येणार असून ज्यांचे छायाचित्र प्रादेशिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे, असे छायाचित्रकार यात भाग घेऊ शकतात. स्व. सुशिला राजेंद्र दीक्षित स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ठ वृत्तांकन (टी.व्ही.) पुरस्कार दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीवर जिल्ह्यातील प्रसारित बातमी ग्राह्य धरण्यात येईल. स्पर्धेसाठी आपल्या बातमीच्या चार सीडी अर्जासह सादर करतानाप्रवेशिका सोबत ‘उत्कृष्ट वृत्तांकन पुरस्कार’ (टेलीव्हीजन) असा ठळक उल्लेख करावा.पुरस्कारासाठी १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत प्रकाशित झालेले लिखाण आणि छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. लिखाण मूळ स्वरूपात आवश्यक असून भाषांतरित नसावे. स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारे साहित्य मूळ प्रतीसह चार छायांकित प्रतीत असावे. मूळ साहित्यावर नाव नसल्यास त्या कालावधीत संबंधित वर्तमानपत्राचा प्रतिनिधी असल्याचा पुरावा प्रवेशिकेसोबत जोडावा. ही स्पर्धा खुली असून स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका, सोबत आपली बातमी कोणत्या स्पर्धेसाठी आहे, याचा स्पष्ट उल्लेख तपशीलवार करावा. यापूर्वी दोनदा पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांनी त्या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवू नये. सर्व प्रवेशिका १५ जुलैपर्यंत स्पर्धा संयोजक, प्रेस क्लब, जुना वरोरा नाका, चंद्रपूर या पत्त्यावर पाठवाव्या, असे आवाहन स्पर्धा संयोजक जितेंद्र मशारकर, साईनाथ सोनटक्के, देवानंद साखरकर, मंगेश भांडेकर, कमलेश सातपुते यांनी केले आहे.
श्रमिक पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांसाठी प्रवेशिका आमंत्रित
By admin | Updated: July 5, 2017 01:07 IST