परीक्षा काळातच स्पर्धा : शिक्षक संघटनांकडून रोषचंद्रपूर : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या बीटस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन माहे डिसेंबर व जानेवारी या महिन्यामध्ये केले जाते. मात्र यावर्षी चक्क परीक्षा काळात म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचे शहानपण जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सुचले आहे. या स्पर्धांबाबत शिक्षक संघटनांकडून रोष व्यक्त केला जात आहे.जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्या बीटस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवासाठी लागणारा खर्च हा जिल्हा परिषदेच्या फंडामधून केला जातो. चालु सत्रात बिटस्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजनही पार पडले. साधारणत: दरवर्षी जानेवारी महिन्यामध्येच जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन केल्या जात होते. मात्र यावर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला या स्पर्धेचा विसर पडला आणि आता उशीरा शहानपण सुचल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ६ मार्चला एक परिपत्रक काढून खेळाडू विद्यार्थ्यांच्या याद्या मागविल्या आहेत. यावरुन मार्च महिन्याच्या कडक उन्हात स्पर्धा घेण्याचा जि.प. शिक्षण विभागाचा मानस दिसून येते. जिल्ह्यातील उन्हाची तिव्रता लक्षात घेता, जिल्हा परिषदेने १० मार्चपासून जि.प.च्या शाळा सकाळपाळीत सुरू केल्या आहेत. अशा स्थितीत दिवसभर मैदानी स्पर्धा घेतल्यास उन्हाच्या त्रासामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे यांनी शिक्षणधिकारी (प्राथ.) राम गारकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. सध्या परीक्षेचे दिवस असल्याने जिल्हास्तरीय बालक्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नये, असे निवेदनातून म्हटले आहे. आयोजित स्पर्धा रद्द करण्याची मागणी म.रा.प्राथ. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे, सचिव किशोर उरकुंडवार, सुभाष बेडर, कुंटावार, अशोक टिपले, संजय बट्टे, विठ्ठल आवारी, चांभारे, मारोती जिल्हेवार, तामदेव कावळे, मारोती आनंदे, विष्णू बढे, नारायण तेल्कापल्लीवार, बारसागडे आदींनी केली आहे.
तीव्र उन्हात क्रीडा स्पर्धा आयोजनाचे शहाणपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:35 IST