वडिलांची विनंतीही धुडकावली: सॅन्जो कॉन्व्हेंट स्कूलमधील प्रकारगोंडपिपरी : येथील नामांकित सॅन्जो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इयत्ता ९ व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला ताप आला. वडिलांच्या विनंतीनंतरही शाळा व्यवस्थापनाने तिला रजा न देता तसेच विव्हळत शाळेत ठेवले. यामुळे संतापलेल्या पालकाने अखेर शिक्षण विभागाचे कार्यालय गाठून रितसर तक्रार नोंदविली. ही घटना आज गुरुवारी गोंडपिपरी येथील सॅन्जो कॉन्व्हेंट स्कूल येथे घडली. या प्रकारामुळे पालकवर्गात कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.स्थानिक शहरात गेल्या अनेक वर्षापासून बालकांचे सीबीएसी अभ्यासक्रम असलेले सन्जो कॉन्व्हेंट कार्यरत आहे. आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या हेतूने शहरातील बहुतांश पालकवर्ग या शाळेत आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवित आहे. मात्र कुठल्यानकुठल्या कारणामुळे सदर शाळा व्यवस्थापन चर्चेचा विषय बनत असून आज घडलेल्या एका घटनेमुळे पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सदर शाळेत शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणाहून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून काही काळ वंचित ठेवण्याचा प्रकारही घडल्याची माहिती आहे. आज इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेणारी आंचल विजय ठाकरे ही विद्यार्थिनी नियमित वेळेवर शाळेत गेली. मात्र कालपासूनच तिला तापाची कण-कण जाणवत असल्याने वडिलांच्या नकारानंतरही तिने अभ्यासक्रम व शालेय शिस्तीच्या धाकाने शाळेत जाणे गरजेचे असल्याचे सांगत शाळेत जाणे पसंद केले. तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करीत तिचे वडील विजय ठाकरे यांनी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान सलग दोनदा शाळेला भेट देवून आपल्या पाल्याचा तापा वाढत असल्याचे सांगत शाळा व्यवस्थापनाकडे सुटी देण्याची विनंती केली. मात्र शाळा व्यवस्थापनाने वडिलाची विनंती धुडकावून आचल हिला वडीलांसोबत जाऊ देण्यास नकार दिला. शाळा सुटेपर्यंत सुटी मिळणार नाही, असे वडीलास बजावले. यावरुन विजय ठाकरे यांनी शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे धाव घेत लेखी तक्रार केली आहे. केवळ शालेय शिस्त व शाळेच्या नियम अटी भंग होऊ नये म्हणून तापाने विव्हळत विद्यार्थिनीला शाळा सुटेपर्यंत रजा न दिल्याने पालकात संताप व्यक्त केला जात आहे. गटशिक्षणाधिकारी शाळाव्यवस्थापनाविरुद्ध काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)शाळेचीच चूकशाळेत घडलेला प्रकार योग्य नसून वडिलाच्या विनंतीनुसार शाळा व्यवस्थापनाने त्या आजारी विद्यार्थिनीस सुटी द्यायला हवी होती. याबाबत शिक्षण विभागाकडून चौकशीअंती कारवाई केली जाईल, असे मत येथील गटशिक्षणाधिकारी देवतळे यांनी सांगितले. पालकवर्गात संतापसॅन्जो कान्व्हेंट स्कूलमध्ये एका आजारी विद्यार्थिनीसोबत घडलेल्या या प्रकाराची अल्पावधीतच परिसरात चर्चा होऊ लागली. या घटनेचा पालकांनी निषेध केला असून परिसरात सर्वत्र संताप केला जात आहे.
तापाने विव्हळणाऱ्या विद्यार्थिनीला रजा नाही
By admin | Updated: December 4, 2015 01:20 IST