चारगाव (खदान) : भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा गावात गेल्या आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांची पाण्यासाठी होरपळ सुरू आहे. येथील पाण्याचे मुख्य स्रोत बंद पडल्याने अनेक नागरिक गाव सोडून जाण्याच्या विचारात आहेत. गावात दोन वर्षांपासून पाणीटंचाई प्रश्न बिकट होत असल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी केल्या. या तक्रारीची दखल घेऊन वेकोलिने काही दिवसापूर्वी बंद पडलेल्या हातपंपाजवळच दुसरा हातपंप खोदून दिला. मात्र त्याला पाणी लागले नाही. गावातील सर्व विहिरी आटल्याने विहीरी गावात नसल्याची स्थिती आहे. गावात दोन हातपंप असले तरी एका हातपंपाचे पाणी थोड्या-थोड्या अंतराने काढावे लागते. गावाची लोकसंख्या हजारच्या आसपास असून गावात दुसरे पाण्याचे स्रोत नाही. येथील पाणीटंचाई पाहता जिल्हा परिषदेतर्फे एक हातपंप मंजूर झाला. हातपंप कुठे खोदायचा, याची पाहणी पाणी सर्वेक्षण अधिकारी यांनी केली व स्थळ दर्शक नकाशा ग्रामपंचायतीला दिला. मात्र २१ मार्चला हातपंप खोदण्यासाठी मशीन गावात आली त्यावेळी पाणी पुरवठा अधिकारी चंद्रागडे यांनी राजकीय दबावापोटी ‘माझ्या म्हणण्याप्रमाणे हातपंप खोदलात तर ठीक नाही तर मशीन परत पाठवितो’ अशी दबावात्मक भाषा वापरून हातपंप दुसरीकडे खोदण्यास सांगितले. त्यामुळे सुरू असलेल्या हातपंपाच्या अवघ्या १० ते १५ फूट अंतरावर नवीन हातपंप खोदण्यास सुरूवात केली. ८० फुटापर्यंत हातपंप खोदण्यात आले. मात्र जमिनीत खोल खड्डा पडून बाहेर निघणारे पाणी जमिनीत जाऊन हातपंप अयशस्वी ठरला. त्यामुळे जवळच सुरू असलेला दुसरा हातपंपसुद्धा बंद पडला. ठरलेल्या ठिकाणी हातपंप न खोदता अचानक एकमेकाला लागून दुसरा हातपंप का खोदण्यात आला, याबाबत सरपंच व गावकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आणखी बिकट होत असून यावर प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्या अन्यथा जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. याची प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची मागणी आहे. (वार्ताहर)अधिकाऱ्यावर कारवाई करा४हातपंप खोदण्यासाठी पाणी सर्वेक्षण अधिकाऱ्यांने जागा निश्चित करून दिलेली असतानाही पाणी पुरवठा अधिकाऱ्याने मनमानी करून दुसऱ्या जागी हातपंप खोदायला लावले. त्यामुळे सुरू असलेले दुसरे हातपंपही बंद पडले. त्यामुळे पाणी समस्या आणखी तीव्र झाली असून पाणी पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच वनिता बल्की, उपसरपंच मंगेश झाडे, ग्रा. प. सदस्य रामभाऊ आस्वले, रंजना आत्राम, संगीता बावणे यांनी केली आहे.
देऊळवाडा गावात पाण्यासाठी हाहाकार
By admin | Updated: March 23, 2016 01:04 IST