केवळ दुर्लक्ष : अनेक शाळांमधील साहित्यांची चोरीवरोरा: शहरी विद्यार्थ्यासोबतच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान अवगत व्हावे, याकरिता शासनाच्या वतीने लाखो रुपयांचे संगणक साहित्य शाळांना दिले आहे. काही शाळांनी लोकवर्गणीमधून साहित्य मिळविले आहे. या साहित्याची देखभाल करण्याकरिता शिक्षकांच्या नियुक्ती केल्या. परंतु सुटी व रात्रीच्या वेळी शाळांमध्ये सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक शाळांमधील लाखो रुपयांचे साहित्य चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. साहित्य चोरी गेल्यानंतर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान मिळावे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये, याकरिता शासनाच्या वतीने जिल्हा परिषद शाळांना संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर, ओएचडी आदी लाखो रुपये किंमतीचे साहित्य अलीकडच्या काळात शासनाच्या वतीने पुरविण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अधिक असल्याने साहित्य अपुरे जात असल्याचे शाळा प्रमुख व शिक्षकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी लोक सहभाग तसेच सेवा भावी संस्थाकडून साहित्य मिळविले. संगणक शिकविणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बालवयातच संगणकाचे अनुभव येत आहे. मात्र हे लाखो रुपयांचे साहित्य सुटी व रात्रीच्या वेळी असुरक्षित असतात. सुरक्षा वाऱ्यावर असल्याने मागील काही दिवसात शाळेतील संगणक साहित्याच्या चोऱ्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एकापाठोपाठ सुट्ट्या आल्यास साहित्यांची केव्हा चोरी झाली, याची तिथी सापडत नसल्याने पोलिसांचीही डोके दुखी वाढत असल्याचे दिसून येत आहे. चोरी झाल्यास अधिकचा कालावधी झाल्यास पोलिसांचे ठसेतज्ज्ञ व डॉगस्कॉडही काम करीत नसल्याने संगणक साहित्य चोरट्यापर्यंत पोहचून त्यांचा सुगावा लागत नाही. यामुळे चोरट्यांचे अधिकच फावत असल्याचे दिसून येत आहे. संगणक साहित्यांसोबत इतरही साहित्य शाळांमधून चोरी होत असल्याने शाळा प्रमुख व शिक्षकही हतबल होत आहे. (तालुका प्रतिनिधी)