हंसराज अहीर : जल परिषद व कृषी प्रदर्शनीचा समारोपचंद्रपूर : पाणी, पाण्याचा योग्य वापर आणि शेतीला पूरक जोडधंदेच शेतकऱ्यांना आर्थिक मजबुती देण्यास सहाय्यभूत ठरतील, असे प्रतिपादन रसायन व खते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.जिल्हास्तरीय जल व कृषी प्रदर्शनीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. आमदार संजय धोटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेद्र कल्याणकर, जि.प. उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, प्रकल्प संचालक (आत्मा) विद्या मानकर व कृषी विकास अधिकारी प्रविण देशमुख यावेळी उपस्थित होते.पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जागृत राहावे, असे सांगून ना.अहीर म्हणाले, पाणी वापरासंबंधी प्रत्येक गावचा शेतकरी जागृत राहिल्यास पाण्याचा योग्य वापर होईल व सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासणार नाही. ग्रामीण भागात नद्या व नाले वाहून जातात, ही चितेंची बाब असल्याचे नमूद करुन ते म्हणाले, नदी व नाले यावर छोटे छोटे बांध बांधून पाणी अडविणे गरजेचे आहे. गावाला लागून असलेल्या नदीवर बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या निधीपैकी ८० टक्के निधी केंद्र सरकारकडून आणण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. यासाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार करावा अशा सूचना त्यांनी केल्या.शेतीला पूरक व्यवसाय हाच शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता देवू शकते, असे सांगून ते म्हणाले की, रस्त्या लगतच्या सर्व गावात भाजीपाला उत्पादन मोठया प्रमाणात घेतले पाहिजे. जिल्हयातील दोनशे गावं रस्त्यालगत असून या ठिकाणी हा व्यवसाय उत्तम उपाय होऊ शकतो. याची सुरुवात घोडपेठ येथून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संध्या गुरुनुले म्हणाल्या, आधुनिक पध्दतीची शेती करताना उत्तम तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. असे तंत्रज्ञान या परिषदेमधून शेतकऱ्यांना देण्याचा चांगला उपक्रम घेण्यात आला. गावातील नदी नाल्यांना पूर्नजिवीत करुन पावसाचे पाणी अडविल्यास त्याचा भविष्यातील पाणी टंचाईवर उपाय होवू शकतो, असे मत आमदार संजय धोटे यांनी केले. या ठिकाणी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांशी प्रशासनाने संवाद कायम ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.आत्महत्याचा विचार मनात आल्यास एकदा तरी आम्हाला भेटा तुमच्या समस्या व प्रश्नासंदर्भात घटनेच्या चौकटीत बसून तोडगा काढू असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी शेतकऱ्यांना केले. प्रस्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.हसनाबादे यांनी केले तर आभार प्रकल्प संचालक विद्या मानकर यांनी मानले. (प्रतिनिधी)या शेतकऱ्यांना केले पुरस्कृतयावेळी पाहुण्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना विविध पुरस्कार वितरण करण्यात आले. उत्कृष्ट शेतकरी गट- महात्मा फुले शेतकरी स्वंयसहाय्यता बचत गट चोरगाव ता.चंद्रपूर, कृषि मित्र पुरुष शेतकरी बचत गट कहाली ता.ब्रम्हपूरी, हरीत क्रांती शेतकरी बचत गट कोरपना, निसर्ग राजा पुरुष शेतकरी गट पिरली ता.भद्रावती, विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी- रंजना शैलेश बांबोळे कोटगाव ता.नागभिड, दिनेश शेंडे मेंढा ता. सिंदेवाही, सुनील दिवशे आष्टा ता.पोंभुर्णा, उत्कृष्ट फळ उत्पादक शेतकरी- मारोती वनकर गडचांदूर, मधुकर भलमे चारगाव ता.वरोरा, देवीदास पडोळे पांडरपौनी ता.राजूरा, उत्कृष्ठ भाजीपाला उत्पादक शेतकरी- देवानंद निरंजने लावारी ता.बल्लारपूर, रत्नाकर पेटकुले बेंबाळ ता.मूल यांना पुरस्कार देण्यात आले.
जोडधंद्याशिवाय आर्थिक विकास अशक्य
By admin | Updated: February 2, 2016 01:14 IST