राजुरा : शहरातील काही विद्यार्थी दिशाहीन झाले आहे. येथील एका शाळेतील तीन विद्यार्थी चक्क बीअर पिऊन शाळेत गेले. राजीव सेनेचे तालुका अध्यक्ष भुपिंदरसिंग घोतरा यांना हा प्रकार दिसताच त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना माहिती दिली. सदर विद्यार्थी आठव्या वर्गात बसून होते. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी चोप दिला आणि त्यांच्या पालकांना बोलाविण्यात आले.येथील काही शाळेतील विद्यार्थी मुलींना ‘ तू पैसे घेऊन ये नाही तर तुला मारतो’ अशा धमक्या देत असल्याचे समजते. शहरामध्ये बिअर शॉपीचे पीक आले आहे. वार्डावॉर्डात बीअर शॉपी उघडल्या आहे. सातव्या, आठव्या वर्गात शिकणारे विद्यार्थीही बिअरच्या छोट्या बाटला खरेदी करून पीतात. त्याच अवस्थेत शाळा, महाविद्यालयात जात असल्याची बाब या प्रकारावरून उघड झाली आहे. पालकासाठी ही चिंतेची बाब आहे.ज्या विद्यार्थ्यांना बीअर पिल्यावरून हटकण्यात आले, त्यांनी चक्क नागरिकांशी मुजोरीची भाषा वापरल्याची माहिती आहे. माझ्या वडीलाला माहीत आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, असा दम सुद्धा त्यांनी नागरिकांना दिला. अखेर नागरिकांनी त्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकापुढे उभे केले. आठव्या वर्गातील एक विद्यार्थी तर कर्नल चौकात दारू पिऊन पडून होता. त्याला चालताही येत नव्हते. या चौकात चार मुलांना एक मुलगा बियर कॅन पोहचवितो तो क्षण येथील काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रबद्धसुद्धा केला.ही बाब चिंतेची बनलीअसून विद्यार्थ्यांकडे पालकांनी व शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. मुलींना त्रास देणाऱ्या विद्यार्थी तथा युवकांच्या प्रवृत्तीची दखल घेवून धडा शिकवावा, अशी मागणी समाजघटकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)
आठवीचा विद्यार्थी बीअर पिऊन शाळेत जातो तेव्हा...
By admin | Updated: August 13, 2014 23:45 IST