विरुर (स्टे.): राजुरा तालुक्यातील खांबाळा येथे १२ वर्षापूर्वी बांधलेली विहीर खचल्याने हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जानवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. उपाययोजना करुन पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.राजुरा तालुक्यातील खांबाळा येथे जवळपास १२० एवढी लोकसंख्या असून ४० घरे आहेत. या गावात २ विहीरी व ३ हातपंप आहेत. दोन हातपंप बंद स्थितीत आहेत. तीन दिवसापूर्वी गावातील विहिर पूर्णत: खचल्याने गावकऱ्यांना पिण्याचा पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.सदर विहीर २००२ मध्ये बांधली असून अवघ्या १२ वर्षातच विहिर खचल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सदर विहिरीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. विहिर खचल्याने मागील काही दिवसांपासून नळाचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांची भटकंती करावी लागत आहे. शेतातील कामे करावे की, पाणी भरावे असा प्रश्न गावकऱ्यासमोर आहे. पिण्याचे पाणी भरण्यासाठी नागरिक भटकत आहे. नळ योजना बंद असल्याने दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खचलेली विहीर दुरुस्त करुन नळ योजना त्वरित सुरु करावी तसेच निकृष्ठ बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
पाणी पुरवठा करणारी विहीर खचली
By admin | Updated: January 4, 2015 23:08 IST