रस्ता नसल्याने नागरिकांना त्रास
चंद्रपूर : येथील सिस्टर काॅलनी परिसरातील टीपीएम चर्च परिसरात रस्ता नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, परिसरातील अन्य रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. मात्र एकच रस्ता सोडून दिल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात महापालिका तसेच आमदारांनाही निवेदन देण्यात आले आहे.
इंदिरानगरात नाल्यांची समस्या
चंद्रपूर : येथील इंदिरानगर परिसरामध्ये असलेल्या राजीव गांधीनगरमध्ये नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहते. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात नाल्या तयार करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आर्थिक मदतीची मागणी
चंद्रपूर : शहरात फूटपाथ व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. मात्र कोरोना संकटामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या व्यावसायिकांना पुन्हा व्यवसाय उभा करणे कठीण जात आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
कचरा संकलकांची संख्या वाढवावी
चंद्रपूर : शहरातील कचरा घंटागाडीद्वारे नेला जातो. मात्र कचरा संकलकांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. विशेष म्हणजे, एखाद्या दिवशी सुटी घेतल्यास घराघरात कचरा साचतो. त्यामुळे कचरा संकलकांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.
कूलर विक्रीत वाढ
चंद्रपूर : मागील काही दिवसापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कूलर लावण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, काहींनी नवीन कूलरही खरेदी केले आहे. त्यामुळे यावर्षी कूलर विक्रेत्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.