स्थानिक सोमेश्वर महाराज मंदिरात शेतकरी शेतमजूर महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक सभा आयोजित करण्यात आली. सभेत शेतकरी शेतमजुराचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. एसटीची सेवा सुरू झाल्यापासून गडचिरोली, सावली, मूल, सिंदेवाही, नागपूर ही बस नियमितपणे सुरू होती. आरमोरी जवळ वैनगंगा नदीवर पूल झाल्यावर बस बंद करण्यात आली. मूल, सिंदेवाही- नागपूर बस सेवा मागील ४०-५० वर्षांपासून सुरू होती. सकाळी ६.३० ला ही बस मूलवरून सुटायची व सायंकाळी ५.३० ला नागपूरवरून सुटायची. त्यामुळे शेतकरी, व्यापारी व सामान्य प्रवाशांना ती बस सोयीची होती. तसेच मूल ते नागभीड दरम्यान दर तासाला लोकल बसेस सुरु होत्या. त्यामुळे खेड्यापाड्यातील लोकांना ते सोयीचे होते. मात्र मागील दीड दोन वर्षांपासून या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. सिंदेवाहीला तीन जिल्ह्याचे मार्ग मिळतात. १५ दिवसाच्या आत बस सेवा करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
नागपूर बस सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST