लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : तालुक्यातील वाघांच्या हल्ल्यांचा घटना थांबण्याचे नाव घेत नाही. आठ दिवसांत दोन नागरिकांचा बळी गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २७) सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंत तब्बल नऊ तास चंद्रपूर-अहेरी राष्ट्रीय महामार्गावर गोंडपिपरी येथील धाबा टर्निंग पॉईंटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परिणामी महामार्गावरील सुरजागडसह अन्य वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
गेल्या आठवड्यात चेकपिपरी येथे शेतकरी भाऊजी पाल यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आठवडाभरातच अल्का पेंदोर (४३) या महिलेला वाघाने ठार केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्का पेंदोर व पती पांडुरंग पेंदोर हे दोघे शेतात काम करत होते. पांडुरंग हे वैलबंडीने घरी गेले, मात्र अल्का चारा कापण्यासाठी शेतात थांबली. ती बराच वेळ परतली नाही, तेव्हा गावकऱ्यांसह शोध मोहीम राबवली असता तिचा मृतदेह आढळला. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकर, क्षेत्र सहायक पुरी, पोलिस उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले, ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वाघाच्या शोधासाठी पिंजरे लावले असून विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.
वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप
सलग दोन मृत्यूनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी त्यांनी केली. वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप करत नागरिकांनी चंद्रपूर-अहेरी महामार्गावर ठिय्या दिला. आंदोलन दरम्यान गोंडपिपरीसह चेकपिपरी, गणेशपिपरी आणि आजूबाजूच्या गावांतून हजारो नागरिक एकत्र आले. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले, लघिमा तिवारी, सीसीएफ रामानुज, तहसीलदार शुभम बहाकर आर्दीनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
त्यानंतरव आंदोलन मागे, वाहतूक सुरळीत
वाघाला शोधण्यासाठी विशेष शार्प शूटर अजय मराठे व फुलझेले यांना बोलावण्यात आले. ते आल्यानंतरच नागरिकांनी सायंकाळी चारच्या सुमारास आंदोलन मागे घेतले. नऊ तास बंद राहिलेल्या महामार्गावर त्यानंतर वाहतूक सुरू झाली.
प्रवाशांना मोठा फटका
भाऊबीजनिमित्त प्रवाशांची मोठी वर्दळ असताना आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. अहेरी व चंद्रपूरच्या दिशेने जाणारे नागरिक मोठ्या गैरसोयीला सामोरे गेले.
गावकऱ्यांना अंधारात ठेवून मृतदेह नेला
वाघाच्या हल्ल्यानंतर नागरिकांनी मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र वनविभागाने गावकऱ्यांना न सांगता मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला. दरम्यान संतप्त नागरिकांनी गोंडपिपरी शहरात फिरून मार्केट बंद पाडले. नऊ तासांचे महामार्ग बंद आंदोलन आतापर्यंत सर्वात मोठे आंदोलन ठरले आहे.
टि - ११५ वाघावर लक्ष
"टि - ११५ या वाघाला शोधण्यासाठी कॅमेरे बसवले असून, चेकपिपरी-गणेशपिपरी परिसरात दिवसरात्र गस्त सुरू आहे. शेतात पिके उभी असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत आहेत, मात्र वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत."- रामानुज आर. एम., मुख्य वनसंरक्षक अधिकारी, चंद्रपूर.
Web Summary : Villagers in Gondpipari, Chandrapur, blocked a highway for nine hours after two recent tiger attacks. Protesters demanded immediate capture of the tiger, alleging forest department inaction. Traffic was disrupted, and tension prevailed until authorities intervened.
Web Summary : चंद्रपुर के गोंडपिपरी में हाल ही में बाघ के दो हमलों के बाद ग्रामीणों ने नौ घंटे तक राजमार्ग को अवरुद्ध कर दिया। प्रदर्शनकारियों ने वन विभाग पर निष्क्रियता का आरोप लगाते हुए बाघ को तुरंत पकड़ने की मांग की। यातायात बाधित रहा, और अधिकारियों के हस्तक्षेप तक तनाव बना रहा।