शिधापत्रिका धारकांवर अन्याय : अन्न सुरक्षा योजनेतील वास्तवअनेकश्वर मेश्राम - बल्लारपूरबल्लारपूर तालुक्यातील विसापूर गाव सर्वात मोठा ग्रामपंचायतीचे गाव आहे. येथील लोकसंख्या १५ हजारावर आहे. चार स्वस्त धान्य दुकानदारांकडे एकूण दोन हजारावर शिधापत्रिका धारकांची नोंद आहे. परंतु जिल्हा अन्न सुरक्षा पुरवठा विभागाने विसापूर गावाला शहरात टाकले आहे. परिणामी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून अर्ध्यापेक्षा अधिक शिधापत्रिकाधारक वंचित आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ साली अस्तित्वात आला. केंद्र सरकारने महत्वकांक्षी योजना म्हणून रुजू केली. कोणीही शिधापत्रिका धारक उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारने याची अंमलबजावणी फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू केली. त्यानुसार ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के व शहरी भागातील ४५.३४ टक्के शिधापत्रिका धारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.सदर योजनेचा लाभ अंत्योदय, बीपीएल व केशरी शिधापत्रिका धारकांना देण्याचे योजिले आहे. त्यानुसार बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामीण भागात असताना अन्न नागरी पुरवठा विभागाने जावई शोध करून अन्न सुरक्षा योजनेत शहराला जोडले आहे. परिणामी येथील केसरी शिधापत्रिका धारकांवर अन्याय करुन सूड उगवला आहे. यामुळे शिधापत्रिका धारकांना स्वस्त दरात मिळणाऱ्या अन्न धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.विसापूर येथील चार स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून प्राधान्य कुटुंबातील २१९ व अंत्योदय योजनेखाली ५२२ असे एकूण ७४१ शिधापत्रिका धारकांना आजघडीला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ दिला जात आहे. यामुळे ग्रामीण भागात गाव असूनही जाणिवपूर्वक शहरी भागाात विसापूरचा समावेश केल्यामुळे तब्बल ७६७ शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान अन्न नागरी पुरवठा विभागाने केले आहे.विसापूर येथे प्राधान्य कुटुंबातील २१९, अंत्योदय योजनेतील ५२२ व एपीएल केशरी एक हजार २७० असे एकूण दोन हजार ११ शिधापत्रिका धारकांची संख्या आहे. अन्न सुरक्षा योजनेत ग्रामीण भागानुसार यातील एक हजार ५०८ शिधापत्रिका धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे क्रमप्राप्त असताना केवळ शहरी भागाच्या ४५.३४ टक्के लोकसंख्या गणनेला अनुसरुन ७४१ शिधापत्रिका धारकांचा समावेश करण्यात आला. आजही येथील ७४१ शिधापत्रिका धारक रास्त भाव दुकानातील तीन रुपये दराचे गहू व एक रुपया किलो दराच्या भरड धान्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अन्न सुरक्षा योजनेत अन्न नागरी पुररवठा विभागाने विसापूरकरांवर अन्याय केला आहे.
विसापूर गावाला टाकले शहरात
By admin | Updated: August 13, 2014 23:45 IST