राजुरा : ज्या शेतकऱ्यांनी स्वप्नं डोळ्यासमोर ठेवून आपल्या मौल्यवान जमिनी राष्ट्राच्या विकासाकरिता दिल्या, त्या शेतकऱ्यांवर मोबदल्याच्या बाबतीत अन्याय होवू न देण्याची दक्षता आपण घेतली आहे. त्यामुळे १.३० कोटी रुपयांच्या मोबदल्या ऐवजी ५५ कोटी रुपयांचा मोबदला व २३६ नोकऱ्या मिळवून देण्यात आपण यशस्वी ठरलो. एवढेच नाही तर येथील प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के नोकऱ्या मिळवून देण्यात यश आले, ही खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांची सेवा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील पवनी २ व ३ परियोजना या खुल्या कोळसा खाणीचे भूमिपूजन करताना उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आ. अॅड. संजय धोटे, वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक आर. आर. मिश्रा, तांत्रिक निदेशक एस. एस. मल्ली, बल्लारपूरचे क्षेत्रीय महाप्रबंधक एस. के. बक्षियार, कार्मिक निदेशक डॉ. संजीवकुमार भाजपाचे महानगर जिल्हा अध्यक्ष विजय राऊत, भाजपा नेते चंदनसिंह चंदेल, जिल्हा सचिव राहूल सराफ, राजू घरोटे, साखरीच्या सरपंच बेबीनंदा कोडापे, पवनीच्या सरपंचा सरला फुलझेले, वरोडाचे सरपंच साईनाथ देठे आदी मान्यवरांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रारंभी ना. हंसराज अहीर व अन्य अतिथींनी गोमातेचे पूजन करून खाणीचे उद्घाटन करण्यात आले. ना. अहीर पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या जमिनीला पुरेसा मोबदला मिळेपर्यंत ही परियोजना सुरू होवू न देण्याचा संकल्प होता व मोबदला घेवूनच या परियोजनेचे काम सुरू करण्यात आले. हा सामुहिक संघर्षाचा परिणाम आहे. याच ठिकाणी गत महिन्यात प्रकल्पग्रस्तांना धनादेश बहाल करण्यात आले. आज वेकोलिने प्राथमिक धर्तीवर २५ प्रकल्पग्रस्तांना टोकन स्वरूपात नोकऱ्यांचे आदेश दिले. यथावकाश इतरांनाही लवकरच नोकऱ्या देण्याचा प्रयत्न वेकोलि प्रबंधन करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना खुल्या खाणीतच नोकरी देण्याची शिफारस वेकोलिकडे करू, अशी ग्वाही त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
वेकोलि पवनी-२ व ३ परियोजनेचे लोकार्पण
By admin | Updated: December 29, 2015 20:15 IST