चंद्रपूर : वेकोली अंतर्गत येत असलेल्या लालपेठ कॉलनीत अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, ओपन स्पेस, क्वॉर्टर दुरुस्ती, साईनिंग बोर्ड यासारख्या मूलभूत सुविधांकडे वेकोली प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्राप्त झाल्या. त्यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे बैठक बोलावून वेकोली लालपेठ येथील पाणी अंतर्गत रस्ते व इतर मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत आढावा घेतला. वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक साबीर व सहा. प्रबंधक संजय फितवे यांना लालपेठ कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, ओपनस्पेस, क्वॉर्टर दुरुस्ती, साईनिंग बोर्ड यासारख्या मूलभूत सुविधा तसेच वेकोलीच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून ते शक्तीनगर गेटपर्यंत असलेल्या नाल्याची साफसफाई करणे याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपअभियंता भालाधरे यांच्यासह, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महिला व बालकल्याण सभापती रोशनी खान, रामपाल सिंह, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास टेंभुर्णे, पं. स. सदस्य संजय यादव, जिल्हा भाजयुमो अध्यक्ष आशिष देवतळे, नामदेव आसुटकर, सुनील बरियेकर आदी उपस्थित होते.
वेकोली अंतर्गत लालपेठ कॉलनीतील अंतर्गत रस्ते व इतर सुविधा अद्ययावत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST