राजुरा : तालुक्यात आदिवासींच्या जमिनी हडप करुन आदिवासींना बेघर करणारे मात्र समाजात मिरवीत आहे. यामुळे आदिवासीसमाजावर मोठा अन्याय होत आहे. काही जण त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहे. या आदिवासींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.सास्ती येथील बंडू कुळमेथे यांची सात एकर जागा बिना परवानगी हडपली. देवाडा येथील आदिवासी मानक मेश्राम हे वडीलोपार्जीत शेती करीत आहे. १८ फेब्रुवारी २०१५ ला या आदिवासीच्या शेतामधील उभे ज्वारीचे पीक उचलून नेले. हा प्रकार सातत्याने वाढत असल्याने यावर आळा घालणे गरजेचे आहे. मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील देवाडा, लक्कडकोट, येरगव्हाण येथील आदिवासींचा जमिनीवर ताबा आहे. परंतु या जमिनीच्या कागदपत्रावर पूर्वीच्या जमिनदारांचे नाव आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. मताच्या राजकारणासाठी राजकीय नेतेसुद्धा या आदिवासींना न्याय मिळवून देण्यात असमर्थ ठरत आहे. येरगव्हान येथील लता करमनकर या महिलेने सर्वे क्रमांक १४३ आराजी ४.०५ आर शेत ठेक्याने घेतली आहे. दोन वर्षापर्यंत ठेकेकरार नामा लिहून घेतो म्हणून चंद्रपूरच्या व्यक्तींनी त्या जागेची रजिस्ट्री करुन घेतली. लता करमनकर यांनी राजुरा पोलिसात तक्रार दिली आहे. मौजा सास्ती येथील सर्वे क्रमांक १०९/१ मधील १ हेक्टर ४७ आर जमीन मधूकर गिरटकर यांची होती. परंतु याचे वारसदार किंवा जावई यांना नोकरी मिळाली नाही. गरीब लाचार आदिवासी बांधव पोलिसात तक्रार करताना आणि जे धनाठ्य आहे ते पोलिसांना घुस देऊन प्रकरण दाबून टाकतात असा आरोप आता होत आहे.राजुरा शहरामधील सर्वे क्रमांक १४९ मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी ज्या शासकीय आहेत त्याची विक्री झाली असून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
आदिवासींना जीवे मारण्याची धमकी
By admin | Updated: March 14, 2015 01:06 IST