लोकमत न्यूज नेटवर्कमूल (चंद्रपूर) : तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. यामध्ये महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ७:३० वाजता चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत नागाळा कक्ष क्रमांक ५३७ मध्ये घडली. विमल बुधाजी शेंडे (६५) असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, शनिवारी सिंदेवाही तालुक्यात डोंगरगाव कक्ष क्रमांक १३५५ परिसरात मेंढा माल गावातील तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या तीन महिलांना वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
माहिती मिळताच, चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका वेलमे, महादवाडी क्षेत्र सहायक प्रशांत खनके, केळझर क्षेत्र सहायक नंदकिशोर पडवे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. वनविभागाकडून कुटुंबीयाना ३० हजार आर्थिक मदत देण्यात आली. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दबा धरून बसलेला वाघ घेतो जीव...ग्रामीण भागात उन्हाळ्यात रोजगाराचे साधन म्हणून तेंदुपत्ता संकलनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जंगलात जातात. नागाळा येथील बुधाजी शेंडे रविवारी सकाळी पत्नीला घेऊन तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. दरम्यान, दबा धरून असलेल्या वाघाने विमल शेंडे यांच्यावर हल्ला केला. जवळपास असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली असता, वाघाने पळ काढला. मात्र, विमलचा जागीच मृत्यू झाला.
नववर्षात आतापर्यंत १६ जणांचे बळी
- १ जानेवारी २०२५ ते ११ मे २०२५ पर्यंत मानव व वन्यजीव संघर्षामध्ये १६ जण जीवाला मुकले आहेत.
- १४ जानेवारी रोजी जानेवारी लालसिंग बरेला मडावी रा मणिपूर बल्लारशा रेंज दयाराम लक्ष्मण गोडाणे रा विहीरगाव पळसगाव रेंज-
- २८ जानेवारी बंडू कोल्हे राहणार रामपूर ताडोबा बफर रेंज
- २६ फेब्रुवारी रोजी शामराव मंगाम रा. जाटलापूर सिंदेवाही रेंज
- ६ मार्च निलेश कोरेवार राहणार चांदली बूज सावरी रेंज
- ८ मार्च मलाजी येगावार राहणार मूल चिचपल्ली रेंज
- ४ एप्रिल मनोहर चौधरी राहणार आवडगाव दक्षिण ब्रह्मपुरी रेंज
- ५ एप्रिल शेषराव नागोसे राहणार चितेगाव चिचपली रेंज
- ९ एप्रिल भूमिता पेंदाम राहणार कळमगाव तुकूम शिवनी रेंज
- १३ एप्रिल विनायक जांभुडे राहणार चिचखेडा उत्तर ब्रह्मपुरी रेंज
- १५ एप्रिल मारुती बोरकर राहणार गंगासागर हेटी तडोधी रेंज
- २ मे दिवाकर जुमनाके राहणार चक पिंपळखुटा चीचपल्ली रेंज
- १० मे शुभांगी चौधरी राहणार मेंढा माल सिंदेवाही रेंज-कांता चौधरी राहणार मेंढा माल सिंदेवाही रेंज-रेखा शालिक शेंडे राहणार मेंढा माल सिंदेवाही रेंज
- ११ मे विमल शेंडे राहणार पिंपळखुटा चिचपल्ली रेंज.