पैसे द्या, तक्रार मिटवा : पोलिसांकडून नागरिकांना अपमानास्पद वागणूकशंकर चव्हाण जिवतीग्रामीण भागात वास्तव्यास राहून हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना आनंदाने जगता यावे, पोलिसांविषयी नागरिकांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलीस विभागाने गावखेड्यात जनजागृती करण्याची गरज आहे. मात्र असे असताना जिवती तालुक्यातील पोलीस मात्र आपली दबंगगिरी दाखवत पहाडावर सर्वसामान्य नागरिकांमध्ये खाकी वर्दीची दहशतच निर्माण करीत चित्र आहे.तालुक्यात ८४ खेडी गावे आहेत. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीची कामे संपली की, मोलमजुरी करुन आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करतात. हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल, गावात कुठलेही अनुसूचित प्रकार घडणार नाही. यासाठी शासनाने पोलीस खात्याची निर्मिती केली. मात्र पहाडावर उलट घडत आहे. एखाद्या कामासाठी ठाण्यात गेलेल्या नागरिकांना पोलिसांकडून असभ्य वर्तणुक दिली जाते. एखाद्या गावात क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्या तक्रारीला वेगळे वळण देऊन पैसे लुटण्याचा गंभीर प्रकार पोलिसांकडून घडत आहे. तंटामुक्त समितीलाही महत्त्व दिला जात नसल्याची ओरड नागरिकांकडून आहे. पोलिसांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक वैतागले आहे. तालुक्यात अवैध धंद्याना पोलिसांकडूनच प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य नागरिकांची साधी तक्रार असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दोन गटात झालेला वाद जर तंटामुक्त समितीच्या मदतीने समजोता होत असेल तर गुन्हा नोंद करण्याची धमकी दाखवून पोलीस चिरीमिरी वसुल करण्याचा प्रयत्न करतात. असा गोरखधंदाच सर्रास सुरू असल्याने पोलिसांविषयी सामान्य जनतेमध्ये असलेली आपुलकीची भावना दुरावत चालली आहे.तंटामुक्त समित्या कशासाठी?गावातील तंटे गावातच निपटावे, गावात शांतता नांदावी, गाव स्वर्गापरी व्हावे आणि सुरक्षितेची भावना लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या तयार केल्या. मात्र तंटामुक्त समितीला पोलिसांकडून महत्त्व मिळत नसल्याने आणि पोलिसांच्या दंबगिरीला वैतागून समिती अध्यक्षाचा राजीनामा देण्याचे प्रयत्नही झाले आहेत. शासनाने तंटामुक्त समित्या स्थापन केल्या कशासाठी, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारु लागले आहेत.
माणिकगड पहाडावर खाकी वर्दीचा धाक
By admin | Updated: August 26, 2015 00:50 IST