भद्रावती : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या माझी वसुंधरा अभियान तथा स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत नगर परिषद, भद्रावतीद्वारे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘हरित व सुंदर भद्रावती’, ‘पर्यावरणयुक्त, प्रदूषणमुक्त भद्रावती’ या घोषणांनी भद्रावती परिसर दणाणून गेला.
नगर परिषद, भद्रावती कार्यालयाच्या समोर रॅलीचे उद्घाटन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे, नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, ठाणेदार सुनीलसिंह पवार उपस्थित होते. त्यानंतर नगर परिषद कार्यालयापासून बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते परत गवराळा गणेश मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली. गवराळा गणेश मंदिर परिसरात सायकल रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी वसुंधरेचे जतन करण्यासाठी उपस्थित सायकलस्वारांनी शपथ घेतली.
याप्रसंगी डॉ. विवेक शिंदे, डॉ. प्राचार्य एन. उमाटे, नगर परिषद सभापती चंद्रकांत खारकर, माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चतकी, इनर व्हील क्लबच्या सुनीता खंडाळकर, तसेच नगर परिषदेच्या महिला सभापती व्यासपीठावर उपस्थित होत्या. ऑनलाइन घेण्यात आलेल्या रांगोळी व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण याप्रसंगी करण्यात आले.