बल्लारपूर : राज्यातील नगर परिषद अध्यक्षांच्या पुढील सत्राकरिता राखीव जागांसाठी नुकतीच सोडत झाली. त्यात बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्षपद खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. यानुसार बल्लारपूर नगरपरिषदेत सलग तिसऱ्यांदा नगराध्यक्ष म्हणून महिला बसणार आहे.चालू सत्रात या नगरपरिषदेत पहिले अडीच वर्षे खुल्या प्रवर्गातून रजनी घनश्याम मुलचंदानी यांनी नगराध्यक्ष म्हणून काम सांभाळले. त्यानंतर आरक्षणाप्रमाणे सद्य:स्थितीत अनुसूचित जमातीच्या छाया मधुकर मडावी या पदावर विराजमान आहेत. त्यांच्यानंतर म्हणजे आगामी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पुन्हा महिलाच या पदावर आरूढ होणार आहे. या नगर परिषदेचे पुढील नगराध्यक्षपद खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने कोण कोण नगराध्यक्षाच्या लढतीत राहतील, याबाबत आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे. या नगर परिषदेची आगामी सार्वत्रिक निवडणूक २०१६ च्या डिसेंबरमध्ये होईल. निवडणुकीला आणखी दीड वर्ष बाकी आहे. पण, हे नगराध्यक्षपद महिला (खुला वर्ग) राखीव झाल्याने त्यासाठी इच्छुक आत्तापासूनच नगरसेवक आणि त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्याच्या तयारीला लागले आहेत. ज्यांच्यात निवडून येण्याचे कसब आहे, सोबतच आर्थिकदृष्ट्या ते सक्षम आहेत त्यांचीच या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
बल्लारपूरच्या नगराध्यक्षपदी तिसऱ्यांदाही महिलाच
By admin | Updated: April 20, 2015 01:16 IST