पोलीस शिपायाच्या घरात चोरांचा धुमाकूळ
By Admin | Updated: June 13, 2014 00:02 IST2014-06-13T00:02:28+5:302014-06-13T00:02:28+5:30
शहरातील बिरसामुंडानगरमधील रहिवासी पोलीस शिपाई रमेश आत्राम यांच्या घरी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला.

पोलीस शिपायाच्या घरात चोरांचा धुमाकूळ
राजुरा : शहरातील बिरसामुंडानगरमधील रहिवासी पोलीस शिपाई रमेश आत्राम यांच्या घरी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला.
चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्यांनी घरातील आलमारी तोडली. पलंग, सोफासेट, डायनिंग टेबल, दरवाजे, घरातील कपडे, घरामधील धान्यासह घरातील वस्तू जाळून टाकल्या. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
खुद्ध पोलीस शिपायाच्या घरातच चोरटे धुमाकूळ घालत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजुरा शहरात यापूर्वी चोरीच्या अनेक घटना घडल्या. परंतु घरातील सर्व साहित्य जाळून टाकण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच घडला आहे.
राजुरा शहरात व तालुक्यातील गावांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घरी कुणी नसल्याचे पाहून हे चोरटे घरात शिरून तोडफोड करतात. परंतु आता तर या चोरट्यांनी कहरच केला. पोलिसांच्याच घरी चोरी करुन राजुरा पोलिसानांच आव्हान दिला आहे. (शहर प्रतिनिधी)