राजुरा : तालुक्यातील चिचोली येथे डेंग्यूसदृश तापाची साथ पसरली आहे. ताप गावकऱ्यांत फणफणत असून येथील आरोग्य केंद्राचे कर्मचारी मात्र, कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे पंधरवड्यात गावातील पाच जणांचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरु आहे.चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ गावांचा समावेश आहे. मात्र, या आरोग्य केंद्राचे कर्मचारी रुग्णांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. चिंचोली, सातरी, चुनाळा, सुबई आदी गावांत तापाची साथ पसरली आहे. प्रत्येक कुटुंबात तापाग्रस्त एक व्यक्ती आढळून येते. चिंचोली येथील कमलेश दुर्योधन, प्रभाकर हेळे, नेवारे, हबीब पठान, खोब्रागडे या रुग्णांचा तापाने पंधरवड्यात मृत्यू झाला. तर उज्वला सोमलकर, नानजी बोरकुटे या रुग्णांवर चंद्रपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सातरी या गावातीलही दोघांचा मृत्यू झाला. या गावातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाकडे मनुष्यबळ आहे. मात्र, अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. रात्रीच्या सुमारास प्रकृती बिघडल्यास त्यांना इतरत्र हलवावे लागत असते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे आपल्या सोयीनुसार येथे राहत असतात. त्यामुळे त्यांचे महिन्यातून पंधरा दिवस दर्शन होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. औषधी संयोजक व रक्त तपासणी कर्मचारी काही महिन्यांपासून कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे रुग्णालयात गेलेल्या रूग्णांना वेळेवर औषधे मिळत नाही. तर तपासणीही होत नाही. या प्राथमिक आरोग्य कें द्रात रुग्णांची दररोज गर्दी वाढत आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने आरोग्य सेवेपासून मुकावे लागत आहे. गावात तापाची साथ असताना कार्यरत कर्मचारी गोळ्या वाटप करू न तात्पुरता उपचार करीत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही रुग्णाची तपासणी करण्यात आलेली नाही. गावात आरोग्य विभागाची चमू पाठविण्यास सुध्दा दखल घेतली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी याची दखल घेऊन गावात आजारावर उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
चिचोली गावात तापाचे थैमान
By admin | Updated: September 15, 2014 00:01 IST