रोजगारावर कुऱ्हाड : तेंदूपत्ता संकलनाकडे मजुरांची पाठ घनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : शनिवारी एका अस्वलाच्या हल्यात तीन तेंदूपत्ता मजूर ठार झाल्यानंतर किटाळी- खरकाडा परिसरात दहशतीचे जे ढग निर्माण झाले, ते अद्यापही कायम आहेत. शनिवारनंतर दहशतीमुळे किटाळी व खरकाडा परिसरातील एकही मजूर तेंदूपत्ता संकलनाच्या कामावर गेला नसल्याची माहिती आहे. मोहफुले वेचणे, तेंदूपत्ता संकलन करणे व यातून आलेल्या रकमेवर आपली उपजिवीका करणे, हे जंगल परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे प्रमुख काम आहे. शनिवारी हेच काम करीत असताना किटाळी येथील रंजना अंबादास राऊत, बीसन सोमा कुळमेथे आणि खरकाडा येथील फारुक युसूफ शेख या मजुरांचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तर तिघे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर त्या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ती दहशत आजही कायम आहे. किटाळी, खरकाडा, आलेवाही आणि गंगासागर हेटी हा परिसर घनदाट जंगलाने व्याप्त आहे. या जंगलात वाघ आणि बिबट्यांचाही अधिवास आहे. आतापर्यंत या पशुंबाबत हल्ला करुन ठार, जखमी केल्याच्या छोट्या घटना अनेक घडल्या. पण या घटना मनावर न घेता या परिसरात राहणाऱ्या लोकांनी आपली दिनचर्या कायम ठेवली होती. मात्र शनिवारी जी घटना घटली ती घटना या परिसरातील लोकांच्या मनावर आघात करुन गेली आहे. या आघातामधून तो परीसर अद्यापही सावरला नसल्याचे दिसून येत आहे आणि म्हणूनच वर्षातून एकदा येणाऱ्या तेंदूपत्ता सिझनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या किटाळी, खरकाडा, आलेवाही, गंगासागर हेटी या भागातील मजुरांनी शनिवारच्या घटनेनंतर केवळ दहशतीपोटी तेंदूपत्ता संकलनाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. मोहफूल आणि तेंदूपत्ता संकलन हे दोन्ही काम या भागातील लोकांना आर्थिक बळ देण्याचे काम करीत असतात. पण शनिवारच्या घटनेचा धसका नागरिकांनी घेतला आहे. या भीतीमुळे तेंदूपत्ता संकलनाचे काम करणाऱ्या मजुरांनी हे काम बंद केले आहे. त्यामुळे आलेवाही, खरकाडा, गंगासागर हेटी व किटाळी येथील पान फळ्या बंद आहेत. - हितेश मडावी, उपसरपंच आलेवाही
किटाळी-खरकाडा परिसरात अस्वलाची दहशत कायम
By admin | Updated: May 18, 2017 01:28 IST