नवरगाव :नागरिकांनी जंगलात जाऊ नये आणि सरण जाळण्यासाठी लाकडे उपलब्ध व्हावे, यासाठी वनविभागाच्या वतीने लाकडांचा पुरवठा केला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून लाकडे नसल्याने अंत्यसंस्काराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
जंगलात विविध हिंस्र प्राण्यांचा वावर असल्याने कुणीही जंगलात जाऊ नये. शिवाय यातून जंगली प्राणी आणि मानव संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून नवरगाव येथे पेंढरी रोड लगतच्या काष्ठभंडारात जळाऊ लाकडे उपलब्ध केली जातात. तरीपण काही नागरिकांचे जळाऊ लाकडे आणण्यासाठी जंगलात जाणे सुरूच होते. पुन्हा जंगलावरील ताण कमी करण्यासाठी शासन आणि वनविभागाच्यावतीने परिसरातील महिलांच्या नावे गॅस कमी किमतीत उपलब्ध करून दिले. मात्र अलिकडे सिलेंडरचे भाव गगनाला भिडल्याने पुन्हा चुलीवरचा स्वयंपाक सुरू झाला आहे. परिसरातील बरेच नागरिक जळाऊ लाकडे आणण्यासाठी जंगलात जाऊ लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन स्थानिक वनाधिकाऱ्यांनी जळाऊ लाकडे उपलब्ध करावी, अशी मागणी केली होती. मात्र तसे झाले नाही. एखादी व्यक्ती मृत पावल्यास त्याला जाळण्यासाठी वनविभागाच्या या एकमेव काष्ठभंडारात लाकडेच नाहीत. त्यामुळे वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लाकडे उपलब्ध करावीत,अशी मागणी आहे.