लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : शहरातील शहीद वीर बाबूराव शेडमाके चौक ते रोडगुडा हा दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. हाच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणारा मार्ग आहे. याच मार्गावर जीवघेणा खड्डा पडला असून, त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. खड्डा दुरुस्तीसाठी अनेकदा निवेदन देऊनही दुरुस्ती करण्यात न आल्याने संतप्त दोन युवकांनी बुधवारी दुपारी दोन वाजता रस्त्यावरच आंदोलन सुरू केले.मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठा खड्डा पडल्याने खड्डा चुकवत रस्त्यावरून दुचाकी वा चारचाकी कशी समोर नेता येईल, यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी दररोज अपघात घडत आहेत. आता गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम उपविभाग जिवती या कार्यालयासमोरील रस्त्यावरच खड्डे पडले असले तरी त्यांना ते दिसत नाही. सुदैवाने आजपर्यंत जीवितहानी झाली नाही; परंतु संबंधित विभाग डोळेझाक का करत आहे, जीवितहानी झाल्याशिवाय संबंधित विभागाला जाग येणार नाही का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यामुळे संतप्त झालेल्या देवीदास राठोड व मुकेश चव्हाण या युवकांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले. जोपर्यंत रस्त्याचे खड्डे मुजवणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार जिवती यांना दिले आहे. या आंदोलनात आता प्रेम काकडे, रुग्णसेवक जीवन तोगरे, सुनीता नामवाड, विनोद पवार, भारत जाधव हेदेखील सहभागी झाले आहेत.
खड्ड्याला डबक्याचे स्वरूपनगरपंचायतने सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन साचल्यामुळे खड्ड्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या रस्त्याने जात असताना पाणी साचल्यामुळे खड्डा किती खोल आहे, कुठे आहे, याचा अंदाज लागत नाही. म्हणून या ठिकाणी अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
२०-३० मीटरवर सार्वजनिक बांधकाम विभाग असून, पडलेल्या खड्ड्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. रोज ३ ते ४ किरकोळ अपघात होत असतात. तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, दुरुस्ती होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.- देवीदास राठोड, आंदोलनकर्ते जिवती.
रात्रीच्या वेळी हा खड्डा जीवघेणा ठरत आहे. तत्काळ खड्ड्यांची दुरुस्ती हाच ध्येय घेऊन उपोषणाला बसलो आहे.- मुकेश चव्हाण, आंदोलनकर्ते जिवती.