राजेश खेडेकर बल्लारपूर : लग्नसमारंभात फोटोला पूर्वीहून आता अतिमहत्त्व आले आहे. पूर्वीच्या लग्न समारंभाप्रसंगीचे आणि आताच्या लग्न समारंभातील फोटोमध्ये, ते काढण्याच्या पद्धतीत खूपच मोठा बदल झाला असून, लग्नाच्या फोटोग्राफीचे तंत्र अद्ययावत आणि ग्लॅमरस झाले आहे. लग्न समारंभापूर्वी फोटोसेशन अशी एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. या प्रकारात नववधूचे वेगवेगळ्या आकर्षक पोशाख व श्रृंगारातील फोटो गाव वा शहरातील प्रेक्षणीय रम्यस्थळी काढले जातात. याकरिता बहुधा ऐतिहासिक स्थळांची निवड केली जाते. जिल्ह्यातील नववधूंचे आवडीचे ठिकाण बल्लारपूर येथील वर्धा नदी काठावरील सातशे वर्षांपासून उभा असलेला गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला होय !
किल्ला परिसर अजूनही रमणीयचया किल्ल्याचा काही भाग ढासळला असला तरी वेडिंग फोटो सेशनकरिता उत्तम स्थळ साबूत व चांगल्या स्थितीत आहेत. त्यात नदीकाठावरील प्रेक्षणीय राणी महाल, त्यालाच लागून असलेल्या किल्ल्याच्या भव्य भिंतींचा परिसर, त्या भिंतीच्या असलेल्या खिडक्या आणि खिडकीतून नदीपलीकडील दिसणारे हिरवेगार शेतशिवार! सोबतच किल्ल्याचे मोठाले दोन प्रवेशद्वार आणि विहीर परिसर इत्यादी! यामुळेच, लग्नाच्या दिवसात कोणी ना कोणी नववधू या ठिकाणी फोटो काढण्याकरिता येत असतात.