लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माणसामाणसांत भेद निर्माण करून भाजप राजकीय पोळी शेकत आहे. पुढील निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी नेत्यांची एकजुट हवी. पक्ष कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यशापासून कोणीच रोखू शकत नाही, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वतीने येथील शनिवारी आयोजित काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. तत्पूर्वी खासदार धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ना. थोरात यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याणमंत्री व पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, अभिजीत वंजारी, व किशोर जोरगेवार यांच्यासह शिवाजीराव मोघे, अतुल लोंढे, मुन्नाजी ओझा, विनोद दत्तात्रेय, वामनराव कासावार, डॉ. अविनाश वारजूकर, देवराव भांडेकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, यवतमाळ जिल्हा बँक अध्यक्ष टिकाराम कोंगरे, विनायक बांगडे, शिवा राव ही मंडळी मंचावर उपस्थित होते.
भाजपामुळे देशात आणीबाणीसदृश्य स्थिती - खासदार धानोरकरभारतीय जनता पार्टीने देशाला आणीबाणीत लोटले आहे. विरोधात बोलणाऱ्यांना केंद्रीय यंत्रणाचा वापर करून खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे भाजपालाही जशास तसे उत्तर देण्यासाठी मविआ सरकारने पावले उचलावीत, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी ना. थोरात यांच्याकडे केल्या आहेत. मोदी सरकार हे इव्हेंट साजरे करणारे सरकार आहे. ते संकटाचेही इव्हेंट करतात. यापूर्वीही संकटे आली, मोफत लसीकरण झाले. मात्र, काँग्रेसने कधी इव्हेंट केला नाही, याकडेही खा. धानोरकर यांनी लक्ष वेधले. आमदार प्रतिभा धानोरकर, आ. सुभाष धोटे, आ. अभिजीत वंजारी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहोचचावे - वडेट्टीवारआगामी जिल्हा परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी, नगरसेवक, जि. प. सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे काम जनतेपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.