चंद्रपूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची शिक्षक - पालक - शिक्षणप्रेमींना ओळख व्हावी, या उद्देशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत हजारो शिक्षक, पालकांनी लाभ घेत नवे शैक्षणिक धोरण समजून घेतले.
डायटचे प्राचार्य धनंजय चापले यांच्या मार्गदर्शनाखाली या कालावधीमध्ये ऑनलाईन वेबिनरचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रेरणा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणेचे संचालक राहुल द्विवेदी, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबादचे डॉ. नेहा बेलसरे यांची होती. शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी सहकार्य केले.
नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डायटने युट्युब चॅनेलद्वारेही माहिती उपलब्ध करून दिली. नवीन शैक्षणिक धोरण एक दृष्टिक्षेप या विषयावर टाटा ट्रस्ट, मुंबईचे शिक्षण विभाग व्यवस्थापक किशोर दरक यांनी मार्गदर्शन केले. संचालन कल्पना बनसो यांनी केले. ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रल्हाद खुणे यांनी प्रास्ताविक केले. विनोद लवांडे यांनी आभार मानले. अमरावतीचे डॉ. प्रशांत डवरे यांनी मानवी हक्क, निरंतर विकास, राहणीमान विश्वकल्याण, शैक्षणिक नेतृत्व विकसन या विषयावर मार्गदर्शन केले. प्राथमिक, पूर्व प्राथमिक शिक्षण या विषयावर क्लेस्टचे संस्थापक नीलेश निमकर यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय शिक्षा निती व शिक्षक या विषयावर भारतीय शिक्षण मंडळ सदस्य अरुंधती कावडकर यांनी केले. संचालन अलका ठाकरे यांनी केले. डॉ. प्रल्हाद खुणे यांनी प्रास्ताविक केले. धनराज येलमुलवार यांनी आभार मानले. 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र' या विषयावर राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरचे संचालक रवींद्र रमतकर यांनी मार्गदर्शन केले.
या वेबिनारचा लाभ जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील कार्यरत अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणेतील कर्मचारी, शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी यांनी घेतला.