लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुका हा खनिज संपत्तीने समृद्ध आहे. मात्र, औद्योगिक विकासाला अद्याप चालना मिळालेली नाही. कोळसा, चुनखडी, डोलोमाईट व लाईमस्टोन यासारखी महत्त्वाची खनिजे उपलब्ध असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअभावी पूरक उद्योगांची आशा मावळल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यात गडचांदूर, आवरपूर, उपरवाही, नारंडा, परसोडा येथे सिमेंट उद्योग व विरुर येथे कोळसा खाण सुरू आहे. पण तालुक्यातील इतर भागात अद्याप मोठे औद्योगिक प्रकल्प उभारण्यात आले नाहीत. औद्योगिक वसाहत झाल्यास स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. कृषी व खाणकाम आधारित उद्योगांना चालना मिळेल. कोरपना, कातलाबोडी, दुर्गाडी, जेवरा, गांधीनगर, तुळशी घाटराई, मांडवा, सावलहिरा, भोयगाव, पाकडहिरा, बेलगाव, सोनुर्ली, आसन, शिव नारंडा, पिपर्डा, पिंपरी परिसरात औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध आहे.
तालुक्यात वाढू लागले बेरोजगारांचे तांडे
- एमआयडीसी आल्यास १ औद्योगिक विकासाने रोजगार निर्मितीच नव्हे; तर वाहतूक व पायाभूत सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा होईल.
- सध्या सुरू असलेल्या कंपन्यांची रोजगार देण्याची क्षमता संपली. परिणामी, तालुक्यात बेरोजगारांचे तांडे दिसत आहेत.
- एमआयडीसी मंजूर झाल्यास हा तालुका औद्योगिक क्षेत्रात मोठी झेप घेईल. स्थानिक अर्थव्यवस्था भक्कम होईल, अशी नागरिकांना आशा आहे.