लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणस्थळ ठरलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता एकूण १५ जंपिंग सफारी वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वाहनांमुळे वाघांसोबत इतर वन्यप्राण्यांचेही अधिक बारकाईने निरीक्षण करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झाली आहे.
ताडोबा प्रकल्पात जंपिंग सफारी वाहनांची संख्या कमी होती. त्यामुळे पर्यटकांना अशा वाहनांमधून सफारी करण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागत होते. पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन अशा वाहनांची व्यवस्था करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला. या नव्या वाहनांमुळे गाईड, चालक व पर्यटनाशी संबंधित रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. पर्यटकांना वाघ, बिबट्या, अस्वल, जंगली कुत्रे व इतर वन्यप्राण्यांचे बारकाईने निरीक्षण करण्याची संधी या वाहनांतून उपलब्ध झाली. याबाबत मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे म्हणाले, जंपिंग सफारी वाहन हे लक्झरी जिप्सी आहे. यात पर्यटक व छायाचित्रकारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. ही जिप्सी रिसॉर्ट मालकांची आहे. मात्र, त्याची नोंदणी ताडोबा वन विभागात आहे. पर्यटकांना ही जिप्सी हवी असल्यास नोंदणी वन विभागातून होते. नियमित जिप्सीऐवजी ही लक्झरी जिप्सी पर्यटकांना हवी असल्यास उपलब्ध करून दिली जाते.
रिसॉर्टसनिहाय जंपिंग वाहनबांबू फॉरेस्ट सफारी रिसॉर्ट - ३स्वासरा रिसॉर्ट - २ट्री हाऊस रिसॉर्ट - ४लिंबन रिसॉर्ट - २वाघोबा इको लॉज - २रेड अर्थ रिसॉर्ट - २
खास डिझाइन केलेली जिप्सीजंपिंग सफारी वाहने ही खास डिझाइन केलेली जिप्सी आहे. त्यामध्ये आरामदायी आसन, ऊन व पाऊस यापासून बचावासाठी छतावर शेड्स आणि उत्तम आसन व्यवस्था आहे. ही वाहने ताडोबाच्या क्षेत्र संचालकांकडे नोंदणीकृत आहेत. पर्यटकांनी सफारीचे ऑनलाइन बुकिंग केल्यास त्यांना परवानगी दिली जाते. रिसॉर्टच्या जिप्सी वाहनाने सफारी करायची असल्यास सामान्य जिप्सी भाड्याचे संपूर्ण शुल्क भरावे लागते. सफारी गेटवर १००० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागते. विभागीय मार्गदर्शकासह वाहनात वन विभागाचे बघेरा अॅप दिले आहे. त्यातून हे वाहन पर्यटन मार्गावरून जात आहे की नाही, हे पाहता येते. जंपिंग सफारी वाहनांसाठी नियमावली आहे. नियम मोडल्यास वाहनाला निलंबित किंवा नोंदणी रद्द करण्याचा अधिकार वन विभागाला आहे.