शेतकरी संप : लक्कडकोट येथील ‘रास्ता रोको’ही मागेचंद्रपूर : केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करीत विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप अखेर शनिवारी स्थगित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर येथील शेतकरी नेत्यांशी चर्चा करून वाटाघाटी केल्यानंतर शेतकरी संप मागे घेतल्याच्या चर्चा पसरल्या. यामुळे या संपाबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी होणारे विविध संघटनांचे धरणे आंदोलनही स्थगित करण्यात आले. शेतकरी संघटनेचे रविवारचे रास्तारोको आंदोलनही मागे घेण्यात आले आहे. केवळ वरोऱ्यात शनिवारी काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकरी पाठिंब्यासाठी रास्तारोको करून निदर्शने देण्यात आली.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्यात यावा, या व इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला होता. प्रारंभी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवड्यात संप शंभर टक्के यशस्वी होत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातही याचे पडसाद उमटू लागले. काँग्रेस, शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य किसान सभा, राष्ट्रवादी किसान सभा व इतर अनेक संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला. संबंधित शासकीय यंत्रणेमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. दरम्यान, शनिवारी येथील गांधी चौकात काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. याशिवाय ४ जून रोजी शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे रास्तारोको आंदोलन करून तेलंगणा राज्यातून येणारा भाजीपाला व दूधाचे टँकर थांबविण्यात येणार होते. मात्र शनिवारी शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे, असे वृत्त पसरल्याने संपाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे तुर्तास काँग्रेस, शेतकरी संघटना व इतर संघटनांची आपले नियोजित आंदोलन स्थगित केले. वरोऱ्यात रास्ता रोकोशेतकरी संप मागे घेण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व आंदोलने स्थगित करण्यात आले. मात्र वरोऱ्यात काँग्रेसच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. डॉ. विजय देवतळे व काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आलू, कांदे, टोमॅटो आदी नागपूर-चंद्रपूर महामार्गावर टाकून शासनाचा निषेध केला. यावेळी माजी नगराध्यक्ष विलास टिपले, सुनंदा जीवतोडे, विजय पुरी, डॉ. हेमंत खापने आदी उपस्थित होते. चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविणार-पुगलियाशेतकऱ्यांचा संप सुरळीत सुरू असताना राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकरी नेत्याला हाताशी धरून वाटाघाटी केल्या व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून या आंदोलनाला विदर्भ किसान मजदूूर काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा आहे. या संदर्भात रविवारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दिली.या संदर्भात शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्यांनी हा संप पुकारला, तेच अर्ध्यावर खचून गेले. नवरदेवच मागे हटल्यामुळे आम्ही पाठिंबा देणारे वऱ्हाडी काय करणार. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करताना शेतकऱ्यांमध्ये वर्गीकरण करून टाकले. त्यामुळे संपर्कर्त्यांमध्येही फुट निर्माण झाली आहे. तरीही शेतकरी महाराष्ट्र बंदचे आवाहन करतील तर आमच्या संघटनेचा त्याला पाठिंबा असेल. आम्हीही या बंदमध्ये सक्रिय सहभागी राहू, असेही ते म्हणाले.
संभ्रमामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित
By admin | Updated: June 4, 2017 00:26 IST