इको-प्रो व स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचला जीव
चंद्रपूर : शहरातील बिनबा गेट परिसरातून उडणारा एक पक्षी नायलॉन मांजात अडकल्याने कोसळला. छतावर पतंग उडविणाऱ्या मुलांना दिसताच सदर पक्ष्याला पकडण्यात आले. त्यांच्या दोन्ही पंखात मांजा अडकल्याने तो जखमी झाला. त्याची हालचाल कमी होती. मोठा पक्षी असल्याने स्थानिक नागरिकांनी पाहण्यास एकच गर्दी केली होती. इको प्रोच्या सदस्यांनी पक्ष्याच्या पायातील मांजा काढून त्याला जीवदान दिले.
इको-प्रो पक्षी संरक्षण विभागाच्या सदस्यांनी त्वरित धाव घेतली. दरम्यान, बिनबा गेट परिसरातील राजू येले यांच्या घरी छतावर पक्ष्याला सुरक्षित ठेवण्यात आले होते. त्याच्या पंखातून अडकलेला मांजा काढण्यात आला. त्यानंतर उपचार करून गुरुवारी सकाळी इरई नदीच्या पुलावरून सोडण्यात आले.
यापूर्वी मागील काही दिवसात पक्ष्यांना जीवदान देण्यात आले आहे. इको-प्रो चे सचिन धोतरे, नितीन रामटेके, प्रमोद मलिक, कपिल चौधरी, स्वप्नील रागीट, अमोल उत्तलवार यांच्याकडून रेस्क्यू व निसर्गमुक्त करण्याचे कार्य सुरू आहे.
बाॅक्स
नायलॉन मांजामध्ये अडकलेला हा पक्षी 'मोठा पाणकावळा' असून, पाणथळीच्या जागी आढळतो. तलाव परिसरात तो आढळत असून एखाद्या झाडाच्या ओंडक्यावर, दगडावर आपले पंख फैलावून बसतो.
सध्या पंतग उत्सव सुरू असून, मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. त्याचा वापर युवकांकडून केला जात आहे. यामुळे अनेक व्यक्तींना जीव गमवावे लागले आहेत, पशुपक्ष्यांना हे धोकादायक आहे. बंदी असतानासुद्धा याचा वापर अनेकांच्या जीवावर उठला आहे.
मनपा पथक कुचकामी
नायलाॅन मांजा विक्रीवर बंदी आहे. असे असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात या मांजाची विक्री केली जात आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेने पथकाची नेमणूक केली आहे. मात्र या पथकाद्वारे कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.