चंद्रपूर : गंभीर किंवा दुर्धर स्वरूपाच्या आजारावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. सर्वसामान्य रूग्ण हा खर्च भागवू शकत नाही. त्यामुळे केवळ आर्थिक स्थितीमुळे रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसह संदर्भ सेवा योजनेंतर्गत उपलब्ध करून दिल्या जाते. जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत तब्बल ७ हजार ५८४ रूग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार दुर्धर किंवा गंभीर आजारासाठी लागणारा लाखो रूपयांचा खर्च करू शकत नाही. शिवाय या महागड्या शस्त्रक्रिया मोठ्या शहरांमध्ये कराव्या लागतात. सामान्यांसाठी अडचणीची असणारी शस्त्रक्रियाची ही अडचण शासनाच्या जीवनदायी आरोग्य योजनेने सोडविली आहे. दीड लाख ते अडीच लाखापर्यंत आर्थिक मदत या योजनेंतून रूग्णांना केली जात आहे. शिवाय सर्व प्रकारचा वैद्यकीय सल्ला योजनेंतर्गत सहज उपलब्ध होत असल्याने आर्थिकदृष्ठ्या कमकुवत रूग्णांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली असल्याचे जिल्ह्यातील या योजनेचा लाभ मिळालेल्या रूग्णांवरून दिसून येते. जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभास पात्र ठरणारे ४ लाख २७ हजार ५९५ रूग्ण आहे. या योजनेतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ५८४ रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियांच्या खर्चापोटी शासनाकडून १७ कोटी ३३ लाख ८३ हजार रुपये संबंधित रूग्णालयांना देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सहा रूग्णालयांचा समावेश आहे. या ठिकाणी रूग्ण उपचार किंवा शस्त्रक्रिया करून घेऊ शकतात. याशिवाय जीवनदायी योजनेत नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची सुविधा आहे. (स्थानिक प्रतिनिधी) विमा आधारित आरोग्य योजना नवीन स्वरुपात ४महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या स्मृती वर्षानिमित्त सध्याची आरोग्य विमा योजना नवीन स्वरुपात महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना २ आॅक्टोबर २०१६ पासून लागू करण्यात येणार आहे. ही योजना अधिक सर्वसमावेशक आणि प्रभावी ठरण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण तरतुदींचा यात समावेश केला आहे. एक लाखापर्यंत ुत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना गंभीर व खर्चिक आजारांवरील मोफत उपचारासाठी विमा कंपनीच्या सहभागाने ही योजना राबविण्यात येणार आहे.
जीवनदायी योजनेतून ७ हजार रूग्णांवर शस्त्रक्रिया
By admin | Updated: September 24, 2016 02:22 IST