कोरपना : आदिवासी समाजातील व्यक्तींनी आपल्या रूढी, परंपरा व धार्मिक भावना जपताना श्रद्धेचा आदर करावा. परंतु बुवाबाजी, भूत, पिशाच्च, जादू, करणी अशा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बळी पडू नये. वैज्ञानिक दृष्टी बाळगून शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा, आरोग्य सुविधांचा लाभ घेऊन स्वत:च्या कुटुंबासह संपूर्ण गावाचे आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी विकास प्रकल्प नियोजन समितीचे अध्यक्ष बापुराव मडावी यांनी कोरपना तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांना केले आहे.आदिवासींच्या विकासासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. यात प्रामुख्याने शेती उत्पादन, महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी लघु उद्योग, बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम व सुविधा यासह अनेक योजनांचा समावेश आहे. आदिवासी समाजाला अंधश्रद्धेपासून परावृत्त करून आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी आदिवासी योजनेतून आरोग्य विभागाला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. आदिवासी बांधवांनी अफवावर विश्वास न ठेवता किंवा इतरांच्या भूलथापांना बळी न पडता शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन विकासात सहभागी होण्याचे आवाहन बापुराव मडावी यांनी केले.पावसाळा सुरू झाल्याने साथीने आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वत:च्या घरासह परिसर स्वच्छ ठेवणे, साबणाने किंवा राखेने हातपाय धुवून घरात जाणे, स्वयंपाकाचे व पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवणे, शिळे व उघडे अन्न खाऊ नये, पाणी गाळून व उकळून प्यावे, कचऱ्याचे व शेणाचे ढिग गावाबाहेर तयार करावे, उघड्यावर शौचास न जाणे आदी गोष्टी कटाक्षाणे पाळल्यास आजाराचा शिरकाव होणार नाही व तापाची लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार व औषधोपचार घेतल्यास साथीवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मडावी यांनी सांगितले.कोरपना तालुक्यातील हातलोणी, बोरगाव बु., येरगव्हाण, धानोली तांडा, धानोली या आदिवासीबहुल गावांना भेटी देऊन त्यांनी नागरिकांना माहिती दिली. यावेळी मधुकर कुळमेथे, घनश्याम कोराम, श्रीनिवास धुर्वे, किन्नाके, उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आदिवासी भागात अंधश्रद्धा व आरोग्यविषयक जनजागृती
By admin | Updated: August 18, 2014 23:25 IST