चिनोरा येथील पांडुरंग डोंगरकर हे शेतातील कमी जागेत नवीन प्रयोग करतात. काळा गव्हाच्या पिठाची पोळी सेवन केल्यास शरीरातील अनेक व्याधींवर मात करता येते. त्यामुळे त्यांनी काही वर्षांपासून काळ्या गव्हाच्या बियाणांचा शोध सुरू केला. हे पीक पंजाब-हरियाणा राज्यातील शेतकरी घेत असल्याची माहिती डोंगरकर यांना मिळाली. आपल्या परिसरातील वातावरणात या गव्हाचे पीक होणार की नाही, याबाबत शास्त्रीय माहिती जाणून घेतली. त्यानंतर दिल्लीवरून १२० रुपये प्रति किलोप्रमाणे २० किलो विकत घेऊन अर्ध्या एकरात लागवड केली. त्यातून सुमारे १० क्विंटल काळा गहू होणार असल्याचा दावा डोंगरकर यांनी केला. सध्या काळा गहू परिपक्व झाला असून येत्या एक ते दोन दिवसात कापणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काळ्या गव्हात औषधी गुणधर्म
काळ्या गव्हाच्या पोळीचे सेवन केल्यास मनुष्याचे तारुण्य टिकते. आपल्याकडील गव्हापेक्षा काळ्या गव्हात लोहाचे प्रमाण जास्त आहे. ॲनिमिया, डायबिटीज, लठ्ठपणा व हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांंना काळ्या गव्हाच्या पोळ्या उपयुक्त ठरतात. या गव्हात कोलिक ॲसिड व आयरन फायबर मोठ्या प्रमाणात असते, असेही डोंगरकर यांचे म्हणणे आहे.
कोकणातील शेतकऱ्याने केली बियाण्याची मागणी
सध्या काळ्या गव्हाला ८० रुपये प्रतिकिलो दर आहे. अन्य राज्यात यापेक्षाही जादा दर असतो. व्हाॅट्स ॲपच्या माध्यमातून कोकणातील एका शेतकऱ्यांनी काळया गव्हाच्या बियाण्याची मागणी केली. आपल्या भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत हा काळा गहू विकणार आहे. शिवाय, पुढील वर्षी लागवड क्षेत्र वाढविणार, अशी माहिती पांडुरंग डोंगरकर यांनी दिली.