पाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील चिखली (बु.) ग्रामपंचायतीला स्टुफर्स्ट युनिर्वसीटीची विद्यार्थिनी ग्रैब्रिला स्टीरींगने अभ्यास दौऱ्यासाठी बुधवारी भेट दिली. चिखली या गावाला एखाद्या विदेशी विद्यार्थिनीने भेट देने ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चिखलीवासी भारावून गेले होते. विद्यार्थिनीसोबत युनिसेफ दिल्लीचे मुख्य समन्वयक सुजोय मुजुमदार, प्रायमर युनिसेफ महाराष्ट्रचे युसूफ कबीर, युनिसेफ महाराष्ट्रचे समन्वयक शशांक देशपांडे, शाह हे उपस्थित होते. ग्रैब्रिला स्टिरींग या विद्यार्थिनीला चिखली येथील सरपंच गवरुबाई गेडाम यांनी गावातील पूर्वीची पाणीटंचाई, शासन व गावकऱ्यांच्या सहकार्याने पाणी टंचाईवर कशी मात करण्यात आली याची माहिती दिली. २०११-२०१२ या वर्षी गावातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शासन व युनिसेफतर्फे ११ बंधारे गावालगत बांधण्यात आले. याचा फायदा गावकऱ्यांना झाला. गावातील विहिरींची तसेच हातपंपाच्या पाण्याची पातळी वाढून पाणी मुबलक प्रमाणात आले. गावात नळ योजनेअंतर्गत नाईकनगर, चिखली, कोलामगुडा, तुमरीगुडा, रेंगेगुडा या गावांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले व गाव टँकर मुक्त झाले, अशी माहिती सरपंच गवरुबाई गेडाम यांनी ग्रैबिला स्टीरींग हिला दिली. या कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष यांची शंभर टक्के उपस्थिती होती. ग्रैब्रिला स्टीरींग हिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखली येथे वृक्षारोपण केले. याप्रसंगी उपसरपंच येकरु राठोड ग्रामपंचायत सदस्य भिकाजी आडे ग्रामसेविका बांबोडे, ग्रामविकास अधिकारी येरमे, पर्यवेक्षीका उषा मडावी, मुख्याध्यापिका कलावती वानखेडे, पाटणचे उपसरपंच भीमराव पवार, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, लता कोवे यांच्यासह चिखली व पाटण येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
विदेशी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीची चिखली गावाला अभ्यास भेट
By admin | Updated: September 18, 2015 00:58 IST