चंद्रपूर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रगती साधून त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेने मिशन गरुडझेप ही योजना सुरू केली आहे. यासाठी गावागावांत वाचनालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर गावागावांत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. दरम्यान, पोंभूर्णा तालुक्यातील एका गावातील तरुणाने वाचनालयासाठी जिल्हा परिषद शाळेला आर्थिक मदत केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्यातील कौशल्य ओळखणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेने मिशन गरुडझेप ही योजना सुरू केली असून, यासाठी ६० शिक्षकतज्ज्ञांचा समावेश असलेला गट तयार करण्यात आला आहे. हा गट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार मार्गदर्शन करणार आहे. या योजनेअंतर्गत पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा होंगरहळदी तुकूम येथील संदीप बुरांडे यांनी स्वत: पुढाकार घेत शाळेला वाचनालयासाठी आर्थिक मदत केली. ज्या शाळेने आपल्याला मोठे केले, त्या शाळेचे आणि गावाचे ऋण फेडण्यासाठी आपण मदत करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही मदत मुख्याध्यापक जे. डी. पोटे यांच्याकडे सोपविली. याच पद्धतीने अन्य गावांतील नागरिकांनीही शाळांना मदत केल्यास भविष्यात गावागावांत वाचनालय उभे राहणार असून, स्पर्धात्मक परीक्षेसाठी गावागावांतील विद्यार्थी तयार होणार आहेत.
मिशन गरुडझेपसाठी गावातील तरुणाची वाचनालयासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST