भद्रावती : भद्रावती शहरात आणि तालुक्यात कोविड-१९ रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
१६ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, शहर अध्यक्ष रोहन खुटेमाटे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने येथील तहसीलदार महेश शितोळे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवले. संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-१९ ची दुसरी लाट आल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच भद्रावती शहर व तालुक्यामध्ये अशा बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये गैरसोय होत आहे. संचारबंदी असतानासुद्धा नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. शासनाकडून वारंवार सूचना देऊनही रस्त्यावर विनाकारण फिरणे, गर्दी करणे आदी प्रकार थांबले नाहीत. त्याकरिता भद्रावती शहरात कडक संचारबंदी लावण्यात यावी व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती खा. बाळू धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ठाणेदार, मुख्याधिकारी आणि संवर्ग विकास अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.