नळ योजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या; परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नाही.
पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने, जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला, परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे.
शाळेची धुरा आता स्थानिक समितीवर
नागभीड : शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असला तरी या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक समितीवर सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर समिती गठित करून शासनाकडून सुचविण्यात आलेल्या काही मुद्द्यांवर चर्चा करूनच शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
परवाना शिबिराची गरज
सावली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरचालकांसाठी परवाना शिबिर भरविण्याची गरज आहे.
दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी
कोरपना : येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरावस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून अधिकारी व कर्मचारीही नाही. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागते आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
बांधकाम साहित्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य
चंद्रपूर : शहरातील प्रत्येक वॉर्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्याच्याकडेला बांधकाम साहित्य व वाहने ठेवण्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी नागरिक त्याच ठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे कचऱ्याचे मोठे ढिगारे तयार होत आहे.
खासगी शिकवणी वर्गांना फटका
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे शिकवणी वर्ग संचालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकवणीपासून मुकावे लागले आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून शिकवणी वर्गाला परवानगी द्यावी, अशी मागणी आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने अडचण जाते.
कठड्याअभावी अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला; परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. त्याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.