वरोरा : पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत येणाऱ्या हद्दीत एका घरातून पाच लाख ४८ हजाराचा ऐवज चोरी गेला होता. या प्रकरणात वरोरा पोलिसांनी सर्व मुद्देमालासह दोन आरोपी २४ तासात ताब्यात घेतले. तसेच वरोरा शहरातील एका घरातून एक देशीकट्टा व काडतूस हस्तगत करीत दोघांना ताब्यात घेतले. अल्पावधीत दोन्ही गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जून इंगळे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधिक्षकांनी एका कार्यक्रमात बेस्ट प्रॉपर्टी रिकव्हर्ड अवार्ड देवून गौरव केला.वरोरा शहरातील शिवाजी वॉर्डातील माया गजानन कुरेकार या आपल्या कुटुंबियासह बाहेर गावी गेल्या असता खिडीतील चावी घेऊन चोरट्यांनी दार उघडले व कपाटातील सोने व रोख असा पाच लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. वरोरा पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अत्यंत गोपनिय पद्धतीने या चोरीचा तपास करून ४८ तासांच्या आत दोघांना अटक करून चोरी गेलेला पाच लाख ४८ हजार रुपयांचा ताब्यात घेतला. तसेच एप्रिल महिन्यातच वरोरा शहरातील महात्मा गांधी वॉर्डातील एका घरात देशीकट्टा व काडतूस असल्याची गोपनिय माहिती वरोरा पोलिसांच्या डीबी पथकास मिळाली. या पथकाने थोडाही वेळ न दवडता देशी कट्टासह एक जिवंत काडतूस व दोघांना अटक केली. अल्पावधीतील यशस्वी कामगिरीची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.राजीव जैन यांनी घेतली. ही कामगिरी बजावणारे वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जून इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल सांगळे, पोलीस हवालदार उमाकांत गौरकार, पोलीस शिपाई दामोधर करंबे, निकेश ठेंंगे, निलेश मुळे, अनिल बैद, राकेश तुराणकर यांना जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी झालेल्या एका समारंभात गौरविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
एसपींनी केला वरोरा पोलिसांचा गौरव
By admin | Updated: April 19, 2015 01:06 IST