घुग्घूस : घुग्घूस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळेपर्यत ग्रामपंचायतची निवडणूक रद्द करावी, यासाठी सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीच्या वतीने मंगळवारी नागरिकांनी अर्धनग्न हो्ऊन मुंडण आंदोलन केले. दरम्यान ग्रा. पं. निवडणुकीसाठी मंगळवारपर्यंत एकही नामांकन अर्ज दाखल केले नाही.
घुग्घूस हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. शहराची लोकसंख्याही मोठी आहे. त्यामुळे नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. परंतु, नगर परिषदेचा दर्जा दिल्याशिवाय ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी न होण्याचा इशारा सर्व राजकीय पक्षांनी दिला. मंगळवारी नागरिकांनी ग्रामपंचायतची निवडणूक रद्द करा, अशा घोषणा देत ग्रामपंचायतच्या प्रांगणात मुंडण आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, यंग चांदा ब्रिगेडचे इम्रान वाशीम, माजी सरपंच व भाजपचे नेते संतोष नूने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुला, शिवसेना तालुका उपप्रमुख गणेश शेंडे, जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव सूरज कुंनूर, वंचित बहुजन आघाडी शहर प्रमुख रमेश वनकर, यंग चांदा ब्रिगेडचे स्वप्नील वाढई, बैद्ध विहार आम्रपालीचे बंडू रामटेके, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे गौतम गुडधे व नागरिक आंदोलनात सहभाग झाले होते.
बॉक्स
जोरगेवारांनी घेतली ग्रामविकास मंत्र्यांची भेट
घुग्घूस नगर परिषदे मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मंगळवारी मुंबईत भेट घेतली. शिवाय, नगर परिषदेची फाईल मान्यतेसाठी त्यांच्याकडे सुपूर्द केली. सर्व राजकीय पक्ष व घुग्घूसवाशींची मागणी लक्षात घेऊन तेथील ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली. ना. मुश्रीफ यांनी या प्रकरणाची फाईल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाचे उपसचिव माळी यांना दिले. त्यानूसार ही फाईल ग्रामविकासमंत्री राज्यमंत्री सत्तार यांच्याकडे पोहचती झाली. त्यावर स्वाक्षरी करून ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडे फाईल पाठविण्यात आली.