कन्हारगाव अवैध बांबुतोड प्रकरण : ९० बांबुरांझीतून ३ हजार बांबूची तोड कोठारी : कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. १३९ मध्ये अवैधरित्या बांबुची कत्तल करण्याचा प्रकार उघड होताच मंगळवारपर्यंत ‘असा प्रकार घडलाच नाही’ असे सांगणारे अधिकारी अचानकपणे ९० बांबु रांझीतून ३ हजार बांबू, एक हजार बांबूचपाटी व १ हजार बांबू बंडल तोडल्याची कबुली दिली. मात्र सदर प्रकार अंगलट येवू नये म्हणून बिनकामी वनरक्षकांवर दोष देत मजुरांनी चुकीने तोड केल्याचे सांगत सारवासारव करण्यास विसरले नाही.सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात बांबु निष्कासनासाठी कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील ८ कक्षांची निवड करून अंदाजे १५ लक्ष लांब बांबू, ४० हजार बांबु बंडल व १ लक्ष ६० हजार बांबु चपाटी तोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. यात कक्ष क्र. १३९ या कक्षातून बांबु निस्कासनास मंजुरी नव्हती. तरीही कक्ष क्र. १३१ मधून ६० हजार बांबु तोडण्याचे उद्दीष्ट पूर्ण होत नसल्यामुळे कक्ष क्र. १३९ मधून बांबुची अवैध तोड करण्यात आली. या कक्षाची जबाबदारी वनाधिकाऱ्यांनी प्रांजली लालसरे या वनरक्षकाकडे सोपविली. मात्र प्रत्यक्षात वनाधिकाऱ्यांचा विश्वास रोजंदारी मजुर महादेव आत्राम यांच्याकडे सर्व निष्कासनाच्या कामाची जबाबदारी दिली. या कक्ष क्र. १३१ चे सीमांकन वडगावकर या वनरक्षकाने केले. तर बांबु तोडण्याचे मजुर, त्याचे अंडव्हास व पगार करण्याचे काम महादेव आत्रामच करीत असल्याची कबुली अनेक मजुरांनी दिली. लालसरे वनरक्षक केवळ नाममात्र कर्मचारी होते. त्यामुळे कक्ष क्र १३९ मध्ये झालेली तोड ही चुक मजुर व वनरक्षकांची कशी असा प्रश्न निर्माण होतो. निष्कासनाचे काम सुरू झाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी व संबंधित सहायक व्यवस्थापकांनी एकदाही भेट का दिली नाही, दिली तर हा प्रकार का दिसला नाही, असे अनेक प्रश्न घोंगावत असून स्वत:ला वाचविण्यासाठी अनेकांना जबाबदार धरण्याचे षडयंत्र सुरू आहे. (वार्ताहर)
अधिकाऱ्यांची सारवासारव, दोष वनरक्षकावर
By admin | Updated: January 21, 2016 01:06 IST